एपी, न्यूयॉर्क
अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटागॉन’ची गोपनीय कागदपत्रे (पेंटेगॉन पेपर्स) उघड करून व्हिएतनाम युद्धाबाबत सरकारची संशयास्पद भूमिका आणि अमेरिकन जनतेची केलेली फसवणूक उघड करून ‘जागल्या’ची (व्हिसलब्लोअर) भूमिका निभावणारे डॅनियल एल्सबर्ग यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सूडबुद्धीतून केलेली कृत्ये उघड झाल्याने निक्सन यांना कालांतराने राजीनामा द्यावा लागला.
एल्सबर्ग यांनी या वर्षी फेब्रुवारीत जाहीर केले होते, की स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे ते गंभीर आजारी आहेत. शुक्रवारी सकाळी एल्सबर्ग यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर केले. एल्सबर्ग यांच्यामुळे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला पहिल्या दुरुस्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला
१९७० च्या प्रारंभापर्यंत एल्सबर्ग उच्चभ्रू सरकारी-लष्करी सल्लागार होते. मात्र त्यानंतर त्यांनी ४७ खंडांतील सात हजार पानांचा अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा तत्कालीन इंडोचायनामधील (व्हिएतनाम) अमेरिकेच्या भूमिकेचा अहवालासंबंधीं प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनामागील स्रोत आपण असल्याचे जाहीर केले. त्यांनी १९६० च्या दशकात व्हिएतनामप्रश्नातील सरकारी आणि खासगी सल्लागार म्हणून काम केले होते. युद्धभूमीवर आपला जीव धोक्यात घालून त्यांनी सर्वोच्च सुरक्षा मंजुरी मिळवून देऊन ते अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे विश्वासू बनले होते. कालांतराने इतर लाखो अमेरिकन नागरिकांप्रमाणे ते दीर्घकाळ चाललेल्या व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात गेले.
‘अमेरिकन लष्करी विश्लेषक’ अशी ओळख असलेल्या एल्सबर्ग यांनी १९७१ मध्ये व्हिएतनाम युद्धाशी संबंधित ‘पेंटागॉन पेपर्स’ उघड केल्यामुळे त्यांना ‘अमेरिकेतील सर्वात धोकादायक माणूस’ म्हणून संबोधले गेले. तत्कालीन निक्सन प्रशासनाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील या अहवालातील तपशीलाचे प्रकाशन रोखण्याचा प्रयत्न केल्याने सर्वोच्च न्यायालयात खटला चालला. हा अहवाल उघड झाल्याने अनेक अमेरिकन अध्यक्षांनी जनतेच्या केलेली फसवणूक उघड झाली.