भारतामधील इतर राज्यांच्या तुलनेत काहीशी मोकळीढाकळी संस्कृती असणाऱ्या गोव्यात आता पर्यटकांवर काही बंधने येणार आहेत. अनेकजणांसाठी गोवा ही आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाण्यासाठीचे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ असते. त्यामुळे पर्यटनाच्यादृष्टीने गोवा नेहमीच भारतामधील ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरले आहे. मात्र, गोवा सरकारच्या एका निर्णयामुळे हा आनंद किंचित कमी होण्याची शक्यता आहे. यापुढे गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मद्यप्राशन करताना आढळल्यास तुमच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई होऊ शकते. वेळ पडल्यास यामुळे तुम्हाला जेलची हवाही खावी लागेल, असा आदेश भाजप सरकारकडून काढण्यात आला आहे. सरकारने मंगळवारी विधीमंडळात याबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यासाठी पर्यटक व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोवा विधानसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्सो यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले की, समुद्रकिनारे स्वच्छ हवेत. तेथे कोणतेही नियमबाह्य कृत्य केले जाऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांनाही आम्ही रोखत आहोत. वेळप्रसंगी समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांना अटकही केली जाऊ शकते, असे आजगावकर यांनी सभागृहात सांगितले. पोलिसांकडून ही कारवाई आत्ताही सुरूच आहे. या प्रकरणात काही गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती देण्यासाठी टूरिस्ट गाईड्सची ‘जागले’ म्हणून मदत घेण्यात येईल. कोणालाही कायदा हाती घेऊ दिला जाणार नाही, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी कलंगूट समुद्रकिनाऱ्यानजीक राहणाऱ्या रहिवाशांनी बीचवर आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मद्यप्राशनाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोवा पोलिसांनी मे महिन्यातच समुद्रकिनाऱ्यांसह सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People found drinking on goa beaches could be arrested tourism minister
First published on: 02-08-2017 at 15:38 IST