PM Narendra Modi Bihar Global Talent Recognition Statement: बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने प्रचंड मोठा विजय मिळवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीवर टीका केली आणि म्हटले की, मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये १० टक्के मतांचा फरक आहे. बिहारमधील सत्ताधारी एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकून निवडणुकीत मोठा विजय मिळवला.
सुरत विमानतळावरील एका कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर बिहारमध्ये जातीच्या राजकारणाचे विष पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, बिहारच्या लोकांनी “जातींच्या आधारावर दुभळी पसरवणारे विष” नाकारले आहे.
“या निवडणुकीत विजयी एनडीए आणि पराभूत महाआघाडीमध्ये १० टक्के मतांचा फरक आहे. याचा अर्थ असा की सरासरी सर्व मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केले”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“बिहार आज जगभरात प्रसिद्ध आहे. जगात कुठेही जा, तुम्हाला बिहारची प्रतिभा दिसेल. बिहार आता विकासाची नवी उंची गाठण्यास तयार आहे. बिहारच्या निवडणुकीत महिला आणि तरुणांचा असा संगम पाहायला मिळाला, ज्यामुळे येत्या काही दशकांसाठी राजकारणाचा पाया मजबूत झाला आहे”, असे ते पुढे म्हणाले.
“सुरतमध्ये वास्तव्यास असणारे माझे बंधू आणि भगिनी या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. बिहारच्या लोकांना राजकारण शिकवण्याची गरज नाही. त्यांच्याकडे जगाला राजकारण शिकवण्याची ताकद आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटी म्हणाले.
बिहार निवडणुकीत काय घडले?
भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.
एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.
दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यांना केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दलाला केवळ २६ जागांवर विजय मिळाला. २०२० च्या निवडणुकीत ७५ जागांसह राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर गेल्या निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ ६ जागांवर यश मिळाले.
