सीमेवरील जिल्हय़ात बोको हरामने ओलिस ठेवलेल्या अनेकांची सुटका करण्यात आली असून, नायजेरिया व कॅमेरूनच्या दलांनी ही कारवाई केली. यात काही तरुण मुलींनाही ओलिस ठेवण्यात आले होते. त्यांना आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या कारवाईत बोको हरामचे शंभराहून अधिक अतिरेकी मारले गेले आहेत.
दोन देशांचे सैनिक नायजेरियाच्या कुमशे शहरात गेले व अतिरेक्यांवर कारवाई करून १०० जणांना ठार केले, त्यात अनेक ओलिसांची सुटका करण्यात आली आहे असे जनरल जेकब कोडजी यांनी सांगितले. हे शहर कॅमेरूनच्या सीमेपासून १५ किमी अंतरावर आहे. आमची मुले व मुली अजूनही सैनिकांबरोबर आहेत व त्यांना बोको हरामच्या छावण्यांवर हल्ले करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरेक्यांचा पूर्ण पाडाव केल्याशिवाय हार मानू नका असे त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. बोको हरामने नायजेरियात सहा वर्षांपूर्वी बंडखोरी सुरू केली होती व तेव्हापासून त्यांच्या कारवाया नायगर, चॅड व कॅमेरून या देशात वाढल्या आहेत. लष्कराने त्यांच्या विरोधात अनेकदा कारवाई केली. जिहादी गटाने म्हटले आहे, की आयसिस गटाशी बोको हरामचे सहकार्य असून, आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेत २० हजार लोक हिंसाचारात ठार झाले, तर २८ लाख लोक विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रे व अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे. बोको हरामने नायजेरियातील चिबोक येथून ३०० शाळकरी मुलींचे अपहरण केले होते व नंतरही दोनशे मुली अजूनही बेपत्ता आहेत.