इंधनाचे दर कमी होण्याची सध्या तरी काही चिन्हं दिसत नाहीयत. या इंधनदरवाढीबद्दल सर्व सामान्यांमध्ये चिंतेचा स्वर उमटताना दिसत आहे. मात्र ही दरवाढ योग्य किंवा अनिवार्य असल्याचे खुलेसा करताना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते वाटेल ते स्पष्टीकरण देत आहेत. तालिबानला दोष देणं, मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणं किंवा इंधनाचे दर वाढलेत तर सायकल चालवा ती आरोग्यासाठी फायद्याची असते असा युक्तीवाद करण्याचे प्रकार भाजपा नेत्यांनी केले आहेत. मात्र याच युक्तीवादाच्या यादीमध्ये मध्य प्रदेशमधील भाजपा नेत्याने नव्याने भर टाकत इंधन दरवाढ अटळ असल्याचं मत व्यक्त केलंय.

मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते आणि मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया यांनी महागाईसंदर्भात केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. इंधन दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता लोकांचे पगार वाढले नाहीत का असा उलट प्रश्न या भाजपा नेत्याने विचारल्याचं पहयाला मिळालं. महागाई वाढत असतानाच लोकांचे पगारही वाढत असल्याचा प्रॅक्टीकल विचार करत महागाई स्वीकारली पाहिजे, असं मंत्री मोहोदय म्हणाले आहेत.

“सरकार सर्व काही मोफत देऊ शकत नाही. त्यामुळे इथून (इंधनावरील करांमधून) सरकारला पैसा मिळतो. याच पैशांमधून सरकारी योजना चालवल्या जातात,” असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे. इंधनदरवाढीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सिसोदिया यांनी आपलं मत व्यक्त केलं. सोमवारी सलग सहाव्या दिवाशी इंधनाचे दर वाढवण्यात आले. सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्लीमध्ये लीटरमागे ३५ पैशांनी वाढवण्यात आले. दिल्लीत पेट्रोल १०९.६९ रुपये प्रती लीटर झालं असून राजधानीमध्ये डिझेल ९८.४३ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहचलं आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ११५.५० आणि डिझेल १०६.६२ वर गेलं आहे.

पेट्रोल डिझेलचे दर १० वर्षाइतकेच असावेत असं लोक म्हणू शकत नाही. लोकांचे पगारही वाढले आहेत. त्यामुळेच “इंधनाचे दर तसेच राहणं अजिबात शक्य नाही,” असंही सिसोदिया म्हणालेत. मागील काही वर्षांमध्ये सर्वच स्तरातील लोकांचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा या भाजपा नेत्याने केलाय. “इंधनदरवाढ झाली तशी पगारवाढ झाली नाहीय का?, लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही का?”, असा प्रश्न मंत्र्याने पत्रकारांनाच विचारला. इतकच नाही तर काँग्रेस सत्तेत असताना वस्तूंचे दर वाढत नव्हते का असा उलट प्रश्नही सिसोदिया यांनी उपस्थित केला आहे. “केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये महागाई वाढली आहे का? ही सातत्याने होत राहणारी गोष्ट असल्याचं आपण मान्य केलं पाहिजे,” असंही ते यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सिसोदियांच्या या वक्तव्याची सोशल नेटवर्किंगवर फारच चर्चा असल्याचं दिसून येत आहे.