भारत बायोटेकच्या इंट्रानेझल (नाकाद्वारे लस) करोना लशीच्या वर्धक मात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना भारताच्या औषध नियामकांनी परवानगी दिली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लस भारताच्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा भाग होतील.

इंट्रानेझल लशीच्या वर्धक मात्रेच्या चाचण्यांना परवानगी देण्याची मागणी भारत बायोटेक कंपनीने डिसेंबरमध्ये केली होती. भारताच्या औषध नियामकांनी गुरुवारी या लशींच्या चाचण्यांस परवानगी दिली. दिल्लीतील एम्ससह देशभरात पाच विविध ठिकाणी या चाचण्या केल्या जातील.  ही लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती किती प्रमाणात वाढते, तसेच ही लस आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आहे का हे या चाचण्यांद्वारे पाहिले जाणार आहे. ऑगस्टमध्ये  दुसऱ्या टप्प्यातील चाचणी झाली होती.

देशभरात २,५१,२०९ नवे करोनाबाधित

देशभरात दोन लाख ५१,२०९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या चार कोटी ०६ लाख झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ६२७ जणांचा करोनाने मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या चार लाख ९२,३२७ झाली आहे.  उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसभरात ९६,८६१ ने कमी झाली असून सध्या २१ लाख ०५,६११ रुग्ण उपचाराधीन आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या ५.१८ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.६० टक्के आहे. दैनंदिन रुग्णवाढीचा दर १५.८८ टक्के आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १७.४७ टक्के आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.