मेहुल चोक्सी हा १३ हजार कोटींचा घोटाळा करुन भारतातून फरार झाला. बेल्जियममधून त्याला अटक करण्यात आली. आता भारताकडून त्याच्या प्रत्यापर्णासाठी प्रयत्न केले जात आहेत. एप्रिल महिन्यात मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली. तेव्हापासूनच त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान भारताने आता बेल्जियमला काही आश्वासनं दिली आहेत.
राकेश कुमार पांडे यांचं बेल्जियम सरकारला पत्र
४ सप्टेंबरला भारतीय गृहविभागाचे सह सचिव राकेश कुमार पांडे यांनी बेल्जियमला पत्र लिहिलं आहे. मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण करुन त्याला भारताता पाठवा अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. भारतातर्फे या पत्रात हे आश्वासन देण्यात आलं आहे की मेहुल चोक्सीला ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल. तीन स्क्वेअर मीटरचा हा सेल असेल. त्यात त्याची ‘पर्सनल स्पेस’ आम्ही देऊ असंही भारताने आश्वस्त केलं आहे. त्याला ज्या सेलमध्ये ठेवण्यात येईल तो स्वच्छ आणि नीटनेटका असेल. तिथे त्याला कॉटन मॅट, बेड शीट, ब्लँकेट सगळं पुरवलं जाईल. वैद्यकीय गरज असल्यास लोखंडी किंवा लाकडी पलंगही त्याला पुरवला जाईल. तसंच पुरेसा प्रकाश आणि खेळती हवाही या ठिकाणी असेल असाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत?
१) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत.
२) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
३) नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना एलओयू(लेटर ऑफ अंडरटेकिंग), फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.
२०१८ मध्ये PNB घोटाळा उघड झाला
पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा २०१८ मध्ये उघडकीस आला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे. दोघंही फरार असल्याने त्यांना पकडण्यात अडचणी येत होत्या. मात्र मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी एप्रिल महिन्यात अटक केली. आता जर त्याला प्रत्यार्पण करुन भारतात आणलं गेलं तर नेमकं काय काय घडलं होतं? घोटाळा काय होता? कुणी मेहुल चोक्सीला मदत केली होती ही सगळी माहिती समोर येणार आहे.