अण्वस्त्रे देशाच्या रक्षणासाठी असतात. आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी नाही. त्यामुळे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न किंवा आव्हान देऊ नका. कारण, आम्ही आता लष्करीदृष्ट्या कमकुवत राहिलेलो नाही. अण्वस्त्रांनी सज्ज असलेला देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते, असे विधान पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सेना दलप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी केले आहे.
पाकिस्तानमधील अस्थिरतेला भारत जबाबदार असल्याचा आरोप मुशर्रफ यांनी यावेळी केला. पाकिस्तानला अण्वस्त्र विरहीत करण्याचा कट भारताकडून रचला जात असल्याचा दावा देखील मुशर्रफ यांनी केला आहे. ते म्हणाले की, देशाच्या अण्वस्त्र क्षमतेचा दिखावूपणा करण्याचा आमचा अजिबात उद्देश नाही. मात्र, आमचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे लक्षात आले तर त्यावर मात करण्यासाठी ही अण्वस्त्रे ताफ्यात ठेवली आहेत. पाकिस्तानला अण्वस्त्रे विरहीत करण्याचा त्यांचा (भारताचा) कट कदापीही यशस्वी होऊ देणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.