उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची घटना ताजी असतानाच आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकऱ्यांविरोधात एक खळबळजनक विधान केलं आहे. “हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात ठिकठिकाणी कार्यकर्ते उभे करा, जशास तसं उत्तर द्या. उचला लाठ्या”, असं भडकावू विधान खट्टर यांनी केलं आहे. रविवारी (३ ऑक्टोबर) मनोहर लाल खट्टर यांनी भाजपा किसान मोर्चाच्या सदस्यांना उद्देशून हे विधान केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वाद सुरू झाला आहे.

मनोहर लाल खट्टर म्हणाले की, “प्रत्येक भागात ५०० ते १००० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी करा. विशेषतः हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात परिस्थिती बिकट आहे. तिथे याची आवश्यकता अधिक आहे. आता शेतकऱ्यांना जशास तसं उत्तर द्या. लाठ्या उचला आणि एकदा तुम्ही लाठ्या उचलल्या की मग कोणाचीच पर्वा करू नका. त्यानंतर तुम्ही तेथे (तुरुंगात) एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने राहाल आणि मोठे नेते व्हाल. तुमची नावं इतिहासात कोरली जातील.”

तुमचा हा गुरुमंत्र कधीही यशस्वी होणार नाही!

मनोहर लाल खट्टर यांच्या या खळबळजनक विधानाबाबत आता देशभरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत खट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

“भाजपा समर्थकांना आंदोलक शेतकर्‍यांवर लाठ्यांनी हल्ला करण्याचा, तुरुंगात जाण्याचा आणि त्यानंतर मोठा नेता होण्यासाठी मदत करण्याचा तुमचा हा गुरुमंत्र कधीही यशस्वी होणार नाही. संविधानाची शपथ घेऊन खुल्या कार्यक्रमात अराजकता पसरवण्याच्या या सूचना देशद्रोहच आहे. मोदी आणि नड्डाजी देखील याच्याशी सहमत आहेत असं दिसतंय”, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खट्टर यांच्या या व्हायरल व्हिडिओ क्लिपवर विरोधी पक्ष आणि संयुक्त किसान मोर्चाचा असा आरोप आहे की, “मुख्यमंत्री खट्टर हे केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना भडकवत आहेत.”