काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात बंड करणारे शहजाद पुनावाला आता काँग्रेस नेत्यांच्या रडारवर आहेत. काँग्रेस समर्थक गौरव पांधी यांनी एका ट्विटमधून पुनावाला यांना लक्ष्य केले आहे. पांधींनी एक जुना फोटो ट्विट केला असून त्यामध्ये पुनावाला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंसोबत दिसत आहेत. काँग्रेस समर्थकांकडून सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. असे असले तरी, या फोटोच्या सत्यतेबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

काँग्रेस समर्थक असलेल्या गौरव पांधी यांचे ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंट आहे. पांधी स्वत:वर नेहरुंचा प्रभाव असल्याचे सांगतात. त्यांनी शहजाद पुनावाला यांचा गोपीनाथ मुंडेंसोबतचा फोटो ट्विट करुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवरील टीका म्हणजे पुनावाला यांची ‘घरवापसी’ आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी पुनावालांना लक्ष्य केले आहे. ‘शहजाद पुनावाला यांनी अतिशय कमी वयात भाजपचा कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती, हे मला माहित नव्हते. या फोटोत पुनावालांसोबत गोपीनाथ मुंडे यांच्यासह भाजपचे इतरही नेते दिसत आहेत. म्हणजे ही ‘घरवापसी’ आहे? की ‘आप’की नजरों ने समझा प्यार के काबिल तुम्हें?’, अशा खोचक शब्दांमध्ये पांधींनी पुनावालांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस समर्थकांकडून करण्यात आलेल्या टीकेला शहजाद पुनावाला यांनी उत्तर दिले आहे. ‘माझे भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत, या गोष्टीचा साक्षात्कार आताच कसा काय झाला?’, असा सवाल त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना उपस्थित केला. ‘याआधी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी माझ्या कामाचे कौतुक करुन मला प्रशस्तीपत्रही दिले आहे. मग आताच ही टीका कशी काय केली जाते?’, असेही शहजाद यांनी म्हटले आहे.

गौरव पांधी यांनी पुनावाला यांच्यावर निशाणा साधताना सूचक विधान केले आहे. पुनावाला भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा आम आदमी पक्षात प्रवेश करु शकतात, असे अप्रत्यक्ष भाष्य पांधी यांनी केले आहे. शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राहुल गांधी यांची अध्यक्षपदी होणारी निवड निश्चित असून त्यासाठी केवळ निवडणुकीचा देखावा उभा केला जात आहे, अशा शब्दांमध्ये पुनावाला यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले होते.