Air India Plane Crash The Wall Street Journal Report: भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) गुरुवारी अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्राच्या एअर इंडिया फ्लाइट १७१ अपघातात “पायलटची भूमिका” या अहवालावर टीका केली आहे. हा अहवाल अपूर्ण आणि निवडक माहितीवर आधारित असल्याचे म्हटले आहे. अंतिम अहवालापूर्वी असे निष्कर्ष काढणे घाईचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका निवेदनात, एएआयबीने म्हटले आहे की, एअर इंडिया अपघातातील त्यांचे प्राथमिक निष्कर्ष “काय घडले” याबद्दल माहिती देण्यासाठी होते आणि या दुर्घटनेची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.

“प्रवाशांच्या कुटुंबातील सदस्यांना, विमानातील कर्मचाऱ्यांना आणि इतर मृत्यूंची संवेदनशीलता लक्षात घेणे आवश्यक आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमे निवडक आणि अपूर्ण वृत्तांकनांद्वारे वारंवार निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. अशा कृती बेजबाबदार आहेत, विशेषतः चौकशी सुरू असताना”, असे एएआयबीने म्हटले आहे.

अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मूल्यांकनाचा हवाला देत, अमेरिकी वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले आहे की, एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर काही सेकंदांतच कॅप्टन सुमित सभरवाल यांनी फ्युएल कंट्रोल स्विच बंद केले होते.

“आम्ही जनतेला आणि माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी तपास प्रक्रियेच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या अकाली कथित गोष्टी पसरवू नयेत”, असे एएआयबीने निवेदनात म्हटले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये काय म्हटले आहे?

एअर इंडियाच्या १७१ विमानाचे नेतृत्व ५६ वर्षीय सभरवाल करत होते. त्यांना एकूण १५,६३८ तास उड्डाणाचा अनुभव होता, तर ३२ वर्षीय फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांना ३,४०३ तास उड्डाणाचा अनुभव होता.

टेकऑफ केल्यानंतर काही क्षणांतच, क्लाईव्ह कुंदर यांनी सभरवाल यांना विचारले की, “तुम्ही स्विच ‘रन’ वरून ‘कटऑफ’ का केले?” असे अहवालात म्हटले आहे. हे लक्षात आल्यानंतर फर्स्ट ऑफिसर कुंदर घाबरले, तर कॅप्टन शांतच असल्याचे दिसून आले, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात नमूद आहे.

लंडनला जाणारे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही सेकंदांतच अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले होते. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २६० जणांचा मृत्यू झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एएआयबीने जाहीर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात असे नमूद केले आहे की, बोईंग ७८७ चे फ्युएल कंट्रोल स्विच उड्डाणानंतर काही सेकंदांत “रन” स्थितीतून “कटऑफ” स्थितीत गेले होते.