वृत्तसंस्था, मुंबई
अहमदाबाद विमान अपघातासंदर्भात दिलेल्या बातमीवरून अमेरिकेतील वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला भारतीय वैमानिकांच्या संघटनेने कायदेशीर नोटीस पाठविली आहे. अपघाताला वैमानिक जबाबदार असावेत, अशा आशयाचे सदर वृत्त नागरिकांची दिशाभूल करणारे असून दोघांनी अधिकृतरीत्या माफी मागावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
‘ब्लॅक बॉक्स’ची तपासणी करणाऱ्या अमेरिकेतील संस्थेच्या हवाल्याने ‘जर्नल’ने मुख्य वैमानिकाने इंधनाचा ‘स्विच’ बंद केला असावा, असे वृत्त दिले होते. तर या वृत्ताच्या आधारे ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेनेही बातमी दिली. त्यानंतर आता या दोघांना ‘द फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’ (एफआयपी) या वैमानिकांच्या संघटनेने कायदेशीर नोटीस पाठविली आहे. याबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन सी.एस. रंधावा म्हणाले, ‘‘सदर वृत्त तथ्याचा विपर्यास करणारे आणि सर्वसामान्यांची दिशाभूल करणारे आहे. यासाठी मी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ला जबाबदार धरेन. त्यांनी स्वत: निष्कर्ष काढले आहेत. ते तपास यंत्रणा आहेत का? मी या प्रकाराचा स्पष्ट शब्दांत निषेध करतो.’’ संघटनेने पाठविलेल्या नोटिशीमध्ये भारताच्या विमान अपघात तपास विभागाच्या (एएआयबी) प्राथमिक अहवालावर देण्यात आलेल्या वृत्ताबाबत माध्यमांमध्ये खुलासा करावा अन्यथा पुढील कारवाईसाठी सिद्ध राहावे, असा इशाराही रंधावा यांनी दिला.
नोटिशीमध्ये काय?
वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सला एफआयपीने ईमेलद्वारे नोटीस पाठविली आहे. ‘‘निवडक आणि बिनबुडाच्या माहितीचा आधार घेऊन काही आंतरराष्ट्रीय माध्यमे अपघाताबाबत निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. तपास सुरू असताना असे करणे बेजबाबदारपणाचे आहे. या भीषण अपघाताकडे जनतेचे लक्ष असून त्यांच्यात भीती पसरेल किंवा भारतीय नागरी हवाई वाहतुकीसंदर्भात संभ्रम निर्माण होईल, असे वागण्याची ही वेळ नव्हे. अधिकृत पुष्टी किंवा अंतिम अहवाल आलेला नसताना अपघाताच्या कारणाबाबत अनुमान काढून कोणत्याही व्यक्तीला, विशेषत: मृत वैमानिकांना दोष देणारी कोणतीही बाब प्रकाशित किंवा प्रसारित करण्यापासून परावृत्त झाले पाहिजे. गृहितकांवर आधारित असा मजकूर प्रसिद्ध करणे बेजबाबदार असून त्यामुळे आपली बाजू मांडू शकत नसलेल्या मृत वैमानिकांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. यामुळे त्या वैमानिकांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास झाला असून वैमानिकांचे मनोबल खच्ची झाले आहे,’’ असे सांगत अधिकृत माफीची मागणी नोटिशीमध्ये करण्यात आली आहे.
●वॉशिंग्टन : अहमदाबाद अपघाताच्या कारणांचा तपास करणारी अमेरिकेतील सरकारी संस्था, ‘नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डा’ने (एनटीएसबी) वॉल स्ट्रीटचे वृत्त उतावीळपणे काढलेले अनुमान असल्याचे स्पष्ट केले.
●‘एएआयबी’कडून अधिकृतरीत्या तथ्य समोर येईपर्यंत माध्यमे आणि जनतेने धीर धरावा, असा सल्ला ‘एनटीएसबी’च्या अध्यक्ष जेनिफर होमेंडी यांनी दिला आहे.
●याचे ‘एफआयपी’चे अध्यक्ष कॅप्टन रंधावा यांनी स्वागत केले असून सत्याच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल ‘एनटीएसबी’चे आभार मानले आहेत.