पिनरायी विजयन केरळच्या मुख्यमंत्रिपदी

मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी राज्यघटनेच्या नावाने, तर पाचजणांनी ईश्वाराच्या नावाने शपथ घेतली.

६ एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) नेतृत्व करून तिला ऐतिहासिक असा सलग विजय मिळवून देणारे माकपचे ज्येष्ठ नेते पिनरायी विजयन यांनी गुरुवारी २० मंत्र्यांसह दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सेंट्रल स्टेडियममध्ये झालेल्या साध्या कार्यक्रमात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी ७७ वर्षांचे विजयन व त्यांचे मंत्री यांना पदाची शपथ दिली. करोनाविषयक नियम पाळून हा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून विजयन यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी राज्यघटनेच्या नावाने, तर पाचजणांनी ईश्वाराच्या नावाने शपथ घेतली. माकपच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळातील इंडियन नॅशनल लीगचे प्रतिनिधी असलेले अहमद देवरकोविल यांनी अल्लाच्या नावाने शपथ घेतली. करोना संसर्गाच्या पाश्र्वाभूमीवर विरोधक काँग्रेस- यूडीएफच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी टाळली.

महासाथीची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवावी, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला दिले होते.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, पॉलिटब्यूरोचे ज्येष्ठ सदस्य, भाकपचे राज्य सचिव कानम राजेंद्रन, तसेच विविध धार्मिक संघटनांचे नेते या कार्यक्रमाला हजर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pinarayi vijayan as the chief minister of kerala akp

ताज्या बातम्या