Act Of God Statement Of Piyush Goel: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. अपघात झाला तेव्हा विमानात २३० प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते. यातील एक प्रवासी वगळता इतर सर्वांचा अपघातात मृत्यू झाला होता. यासोबतच हे विमान ज्या इमारतीवर कोसळले होते, त्यातील काहींचाही यामध्ये मृत्यू झाला होता.

अशा परिस्थितीत आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या विमान अपघाताबाबत एक दावा केला असून, सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

लंडनच्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय सेंटर येथे इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अहमदाबाद विमान अपघातावर भाष्य केले. ते म्हणाले, “हे खूप दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. ही ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे आणि हा एक अपघात आहे, असे दिसते. अर्थात, चौकशी सुरू आहे, परंतु भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्यासाठी हे जगाला जागे करणारे संकेत आहेत.”

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. या बोईंग ७८७-८ विमानात एकूण २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

दरम्यान या भयंकर अपघातातून एकमेव प्रवासी ४५ वर्षीय विश्वास कुमार रमेश हे वाचले आहेत. ते आपत्कालीन एक्झिटजवळील सीट ११ए वर बसले होते. दरम्यान याबाबत बोलताना विश्वास कुमार रमेश म्हणाले की, ते विमानात ज्या ठिकाणी बसले होते तो भाग इमारतीला धडकला नाही, ज्यामुळे जमिनीवर एक अरुंद रस्ता राहिला. त्यामुळे आपत्कालीन एक्झिटचा दरवाजा उघडून त्यांना विमानातून बाहेर पडता आले.

याबाबत डीडी न्यूजशी बोलताना विश्वास कुमार रमेश यांनी सांगितले की, “मी विमाणात ज्या ठिकाणी बसलो होतो ती बाजू इमारतीला धडकली नाही. त्यामुळे विमान आणि जमिन यामध्ये थोडे अंतर होते. मी दरवाजा उघडला त्यातून पळत सुटलो. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी वाचलो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विमानात सीट ११ए ही इकॉनॉमी क्लासच्या पहिल्या रांगेत असते, ज्यामध्ये सहा प्रवाशांना बसता येते. ही सीट आपत्कालीन एक्झिटजवळ असल्याने, रमेश यांना जळत्या विमानातून बाहेर पडण्यात मदत झाली.