Piyush Goyal on US Tariff : भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तणाव वाढला आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेने भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. यादररम्यान केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेने लादलेल्या टॅरिफसमोर भारत कधीही झुकणार नाही किंवा कमकुवत पडणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी अतिरिक्त शुल्क असूनही भारताची निर्यात ही गेल्या वर्षीच्या तुलनेत पुढे जाण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे, ज्यामध्ये रशियकडून कच्चे तेल विकत घेतल्याबद्दल दंड म्हणून २५ टक्के अतिरिक्त टॅरिफचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील अनेक दशकांपासून तयार झालेले संबंध बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने मात्र हे टॅरिफ अन्यायकारक आणि अवास्तव असल्याचे म्हटले आहे, याबरोबरच अमेरिका आणि युरोपातील देश देखील रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा भारताने दाखला दिला आहे.

दिल्ली येथे आयोजित भारत बिल्डकॉन कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी गोयल म्हणाले की, “आमच्याबरोबर कोणी चांगला मुक्त व्यापार करार करू इच्छित असेल तर आम्ही त्यासाठी नेहमीच तयार आहोत. मात्र कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा भारतातील १४० कोटी लोकांच्या आत्मविश्वास आणि आत्मसन्मान लक्षात ठेवून आम्ही कधीही झुकणार नाहीत किंवा कमकुवत ठरणार नाहीत, आम्ही एकत्रितपणे पुढे जात राहू आणि नवीन बाजारपेठा हस्तगत करू.”

गोयल यांनी यावेळी नुकतेच काही देशांबरोबर झालेल्या व्यापारी करारांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला. तसेच त्यांनी देशांतर्गत पोहोच आणि निर्यात वाढीला चालना देण्यासाठी काही उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन देखील दिले.

मी तुम्हा सर्वांना खात्री देतो की येणाऱ्या काळात सरकार विविध क्षेत्रांना पाठबळ देण्यासाठी नवीन उपाययोजना घेऊन येईल, ज्यामध्ये देशांतर्गत पोहोच वाढवणे आणि त्याबरोबरच जगभरातील इतर बाजारपेठांमधील पूरकता शोधली जाईल ज्यामुळे जागतिक स्तरावरील आपल्या वाढीला गती मिळेल आणि यावर्षीची आपली निर्यात गेल्यावर्षीपेक्षा आणखी जास्त होईल, असेही गोयल पुढे बोलतना म्हणाले.

यावेळी त्यांनी भारताची निर्यात ही गेल्या वर्षीपेक्षा जास्त असेल असेही सांगितले. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारूनुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताची एकूण निर्यात आजवरच्या सर्वोच्च उच्चांकावर म्हणजेच ८२४.९ अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहचली आहे. २०२३-२४ या वर्षातील ७७८.१ अब्ज डॉलर्स या निर्यातीच्या तुलनेत ही ६.०१ टक्के इतकी वाढ आहे, जो की भारताच्या निर्यातीत एक उच्चांक आहे.

सरकारने चालू आर्थिक वर्षात २०२५-२६ मध्ये १ ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. जुलै २०२५ मध्ये भारताची एकूण निर्यात ६८.२५ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वर्षी जुलै २०२४ मध्ये निर्यात ही ६५.३१ अब्ज डॉलर्स इतकी नोंदवली गेली होती.