Plane Crashed Near Bhatinda air Force Station : भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केलेला असातना चंदीगडच्या भटिंडा येथे एक विमान पहाटेच कोसळले. या अपघातात एका स्थानिक मजुराचा मृत्यू झाला असून नऊजण जखमी आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भटिंडा येथील भिसियाना हवाई दलाच्या तळापासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या गावाजवळील शेतात हे अज्ञात विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विमान अपघाताचा आवाज येताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अपघात आणि स्फोटानंतर काही वेळातच काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेची माहिती पंजाब पोलिसांना सर्वात आधी मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सूर्योदयापूर्वी लष्कर आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लष्कराने परिसराला वेढा घातला आणि हवाई दलाने छत उभारले. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मलबा गोळा करण्यास सुरुवात केली.

फोटो काढायला गेला अन् ….

गावकऱ्यांनी मृत नागरिकाची ओळख गोविंद अशी केली आहे, जो हरियाणातील हिसार येथील आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येतंय. अपघातस्थळी जाण्याचा प्रयत्न करताना नऊ इतर नागरिक जखमी झाले. त्यांना भटिंडाच्या गोनियाना शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

“गोविंद गव्हाच्या कापणीसाठी येथे आला होता आणि तो अपघातस्थळाजवळील एका खोलीत राहत होता. त्याने अपघाताचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली, परंतु तो त्याच्या खूप जवळ गेला. अचानक, जळत्या विमानाचा स्फोट झाला अन् गोविंद जागीच ठार झाला. इतर अनेक जण जखमी झाले”, असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने सांगितले.