गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात मंदिरात लाऊडस्पीकर वापरून आरती करत असल्याने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. हिंदू मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याच्या कारणावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीला त्याच्याच समुदायातील सदस्यांनी बुधवारी बेदम मारहाण केली. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेहसाणाच्या लंघनाज पोलिसांनी सांगितले की, मृत जसवंतजी ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. पोलिसांनी जसवंतचा मोठा भाऊ अजित याचा जबाब घेतला आणि गुरुवारी सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. जोटणा तालुक्यातील लक्ष्मीपारा गावातील मुदर्डा टेबावलो ठाकोरवास येथील रहिवासी अजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.

अजितने पोलिसांना सांगितले की, “जशवंत आणि मी आमच्या घराजवळील मेलाडी माता मंदिरात आरती करत होतो. आम्ही लाऊडस्पीकरवर आरती करत होतो. तेवढ्यात सदाजी आमच्याकडे आला आणि आम्ही लाऊडस्पीकर इतक्या जोरात का वाजवत आहोत, असे विचारले. आम्ही आरती करत आहोत असे त्याला सांगितले. यावर रागावलेल्या सदाजीने लाऊडस्पीकर लावल्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.”

दोन्ही भावांनी विरोध केल्यावर सदाजीने त्याच्या साथीदारांना बोलावले आणि एफआयआरमधील पाच आरोपी घटनास्थळी पोहोचले. अजितने पोलिसांना सांगितले की, “पाच जणांकडे काठ्या होत्या ज्याने त्यांनी आम्हा दोघांवर हल्ला केला. आमच्या १० वर्षीय पुतण्याने त्याच्या आईला फोन केला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.”

आजूबाजूला जमलेल्या गावकऱ्यांनी दोन्ही भावांना मेहसाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर तेथून त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जसवंत यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अजितच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. यापूर्वी २ मे रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील बावला तालुक्यातील ३० वर्षीय भरत राठोड याला मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आरोपी आणि पीडित हिंदू समाजातील दोन भिन्न जातींचे होते.