पीटीआय, नव दिल्ली

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघांदरम्यान दुबईत रविवारी होणारा क्रिकेट सामना रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका तातडीने सुनावणीसाठी पटलावर आणण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सामना रविवारी होणार आहे. त्याला आम्ही काय करू शकतो? असे मत व्यक्त करताना न्या. जे. के. महेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने ‘सामना होऊन जाऊ दे,’ असेही यावेळी म्हटले. विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती.

पहलगाम हल्ल्यात गेलेले निरपराधांचे बळी आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय जवानांनी प्राणपणाने दिलेले प्रत्युत्तर या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी असा क्रिकेट सामना खेळल्यास त्यातून चुकीचा संदेश जाईल. जो देश दहशतवाद्यांना आसरा देत आहे, त्यांच्याशी आपण क्रीडा सामने खेळून आनंद साजरा करणे अयोग्य असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.