बैतूल : केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना लवकरच सुरू करणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.
मोदी यांनी मंगळवारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत देशात आदिवासींसाठी २४ हजार कोटींची योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, येथे उपस्थित असलेली प्रचंड गर्दी हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळणार याचे संकेत आहेत. मध्यप्रदेशातील जनतेत प्रचंड उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच पराभव स्वीकारला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस संतांकडे वळली आहे. कांग्रेसला माहिती आहे की मोदींच्या हमीपुढे त्यांचे खोटे आश्वासन टिकणार नाही.
हेही वाचा >>> रुग्णांना वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्येच राहिलेल्या डॉक्टरचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू
निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी काँग्रेसच्या दाव्यांमधील फोलपणा उघड होत चालला आहे. बुधवारी आदिवासी गौरव दिवस आहे. मी भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान करण्यासाठी झारखंडला जाणार आहे. यानिमित्त केंद्र सरकार आदिवासींच्या कल्याणासाठी २४ हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करणार आहे.
सर्व आश्वासने पूर्ण करू
जम्मू—कश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, तीन तलाकविरुद्ध कायदा आणि राम मंदिर निर्माण हे कधीच वास्तवात उतरणार नाही, असे वाटत होते. पण हे सर्व भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने करून दाखवले आहे. आम्ही मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असे म्हणत मोदी यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली.