PM Modi Video : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नागरिकांनी स्वदेशी मालाचा वापर करावा असे अवाहन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी दुकानदार आणि व्यापाऱ्यांना देखील स्वदेशी मालाबद्दल विशेष अवाहन केले आहे.
येत्या काही दिवसांत ओळीने येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते. यात पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांच्या बाहेर येथे फक्त ‘स्वदेशी’ वस्तू विकल्या जातात असे बोर्ड लावावेत असे अवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी हे गुजरातमधील अहमदाबाद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
“हा सणासुदीचा काळ आहे, आता नवरात्र, विजय दशमी (दसरा), धनतेरस, दिवाळी, हे सर्व सण येत आहेत. हे आपल्या संस्कृतीचे उत्सव तर आहेतच, तसेच हे आत्मनिर्भरतेचे उत्सव देखील असले पाहिजेत. म्हणूनच, मी तुम्हाला पुन्हा एकदा आग्रह करू इच्छितो की आपण आपल्या जीवनात एक मंत्र स्वीकारला पाहिजे की, आपण जे काही खरेदी करू ते ‘मेड इन इंडिया’, स्वदेशी असेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“मी दुकानदार आणि व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, देशाला पुढे घेऊन जाण्यात तुम्ही खूप मोठे योगदान देऊ शकता, तुम्ही ठरवून घ्या की विदेशी माल विकणार नाही. आणि मोठ्या अभिमानाने बोर्ड लावा की माझ्याकडे स्वदेशी माल विकला जातो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपल्या या लहान-लहान प्रयत्नांनी हे उत्सव भारताच्या समृ्द्धीचे मोहोत्सव बनतील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.