मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बातचीत करून राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे राज्यातील अनेक धरणं भरली आहेत. धरणाची पाणीपातळी वाढल्याने त्यातून पाणी सोडण्यात आले आणि काही जिल्ह्यांमध्ये पूर आलाय. पुराचा सामना करण्यासाठी केंद्राकडून बंगालला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असं आश्वासनही मोदींनी दिलंय. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे.

“गेल्या काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू आहे. पुरामुळे आतापर्यंत सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (डीव्हीसी) धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने पूर्व वर्धमान, पश्चिम वर्धमान, पश्चिम मेदिनीपूर, हुगली, हावडा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमधील प्रमुख भाग पाण्याखाली गेला आहे. बंगालमध्ये पुरामुळे आतापर्यंत १५ जणांनी जीव गमावले आहेत. त्यापैकी काही जणांना वीजेच्या धक्क्याने, साप चावल्याने आणि भिंती कोसळल्याने मृत्यू झाला. पुराचा फटका बसलेल्या सहा जिल्ह्यांमधील लोकांना कमरेपर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरुन संवाद साधत पूरस्थितीची माहिती घेतली असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी लागेल ती सर्व मदत केंद्राकडून दिली जाईल असं आश्वास दिलं असल्याचंही म्हटलं आहे. फटका बसलेल्यांच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी प्रार्थना करत असल्याचं ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे.

 

नुकतीच ममता बॅनर्जी यांनी हावडा जिल्ह्यातील पूरग्रस्त उदयनारायणपूरला भेट दिली. यावेळी राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.