मायावतींची घोषणा; संघ परिवारावर टीका
उत्तर प्रदेशात सत्तेत आल्यास पुतळे उभारणे किंवा स्मारके उभारण्याऐवजी विकासाचे राजकारण केले जाईल, असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जी स्मारके बांधणे गरजेची होती ती उभी केली आहेत, आता विकासावर भर दिला जाईल, असे त्यांनी येथे स्पष्ट केले. विरोधक माझ्यावर स्मारके तसेच उद्यानांवर पैसे खर्च केल्याचा आरोप करतात, मात्र आता त्यांना त्या तिकिटातून पैसे मिळत असल्याचे मायावतींनी सांगितले. कांशीराम यांच्या पुतळ्यासोबत पुतळे उभारण्याचे समर्थन मायावती यांनी केले. कांशीराम यांचे आधुनिक विचार लिखित इच्छा व आदेशामुळेच हे पुतळे उभारल्याचा दावा मायावतींनी केला. इतर पक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती राजकीय स्वार्थासाठी व दलितांच्या मतांसाठी करत असल्याचा आरोप मायावतींनी केला.
पंतप्रधानांवर टीका
दलित समाजाने भाजप व संघ परिवारापासून सावध राहावे, असे आवाहन मायावती यांनी केले. येथील सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी जरी इतर मागासवर्गीय असले तरी त्या समाजासाठी त्यांनी फारसे काही केलेले नाही अशी टीका मायावतींनी केली. भाजप वा संघ एखाद्या दलित व्यक्तीला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रिपद देऊ शकतील, मात्र त्या व्यक्तीला समाजाचे भले करता येणार नाही, असे भाकीत मायावतींनी वर्तवले. विशेष म्हणजे भाजपने उत्तर प्रदेशची धुरा केशव प्रसाद मौर्या यांच्याकडे दिल्याने मायवतींचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.