जपानचे पंतप्रधान १४व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत भेटीवर आलेले जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांना एक खास भेट दिली आहे. या भेटवस्तुला ‘कृष्णपंखी’ म्हणतात. शनिवारी मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांना ‘कृष्णपंखी’ भेट दिली. ही कृष्णपंखी चंदनापासून बनवली जाते. सोबतच या कृष्णपंखीवर भगवान श्रीकृष्णाच्या विविधांगी मुद्रा कलात्मक आकृत्यांमधून दाखवण्यात आल्या आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ही कृष्णपंखी पारंपारिक साधनांचा वापर करून कोरली गेली आहे. त्याच्या वरच्या भागात भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हाताने कोरलेली आकृती देखील आहे. ही ‘कृष्णपंखी’ राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील कुशल कारागिरांनी बनवली आहे. ती दक्षिण भारतातील जंगलात आढळणाऱ्या शुद्ध चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे.
जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर जपानकडून भारतात पुढील पाच वर्षांत ४२०० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली. उभय देशांदरम्यान सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांसाठीच्या करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
जपानची भारतात ४२०० कोटी डॉलर गुंतवणूक; किशिदा- मोदी शिखर बैठकीत युक्रेनचाही मुद्दा
किशिदा यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचा मुद्दाही उपस्थित केला. रशियाचे आक्रमण ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यातून आंतरराष्ट्रीय संबंधांची घडी विस्कळीत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मोदी यांनी मात्र युक्रेनचा थेट उल्लेख केला नाही. त्यांनी यासंदर्भात भूराजकीय घडामोडी असा संदर्भ दिला.
चर्चेनंतर किशिदा यांनी सांगितले की, “मोदी यांच्याशी आमची चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत बळाने एकतर्फी बदल घडविण्याचा हेतू फलदृप होऊ देता कामा नये. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्व प्रश्नांवर शांततापूर्ण तोडगा निघाला पाहिजे, यावर मोदी आणि आमचे एकमत झाले आहे. हिंदू-प्रशांत क्षेत्र स्वतंत्र राहावे यासाठी उभय देशांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे. दोन्ही देशांनी (रशिया-युक्रेन) युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भारत आणि जपान करीत आहे. हा वाद राजनैतिक मार्गाने सोडविला गेला पाहिजे.”