PM Modi Maldives Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. २४ जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. ब्रिटनच्या दौऱ्यात भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे जवळपास दोन्ही देशातील ३४ अब्ज डॉलर्सने व्यापार वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्रिटननंतर पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं.

पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची संयुक्त बैठकही पार पडली. या बैठकीत दोन्ही देशातील मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा देखील झाली. दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मालदीवचं कौतुक केलं. तसेच मालदीवला तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स लाइन ऑफ क्रेडिट देण्याची घोषणा देखील मोदींनी केली. तसेच मालदीव भारताचा फक्त शेजारी नाही तर सहप्रवासी असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचं मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू हे जोरदार स्वागत करताना पाहायला मिळाले. तसेच पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, असं असतानाच दुसरीकडे मोहम्मद मुइज्जू यांचे मेहुणे अब्दुल्ला बिन मोहम्मद इब्राहिम यांनी मोदी यांच्या या मालदीव दौऱ्यावर टीका करताना पाहायला मिळाले. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. दरम्यान, त्यानंतर भारताने अब्दुल्ला बिन मोहम्मद इब्राहिम यांनी केलेल्या टीकेसंदर्भात आता प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलं की, “भारत आणि मालदीवमधील संबंध या काही टिप्पण्यांना तोंड देण्याइतके मजबूत आहेत. भारत-मालदीव संबंधांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे मी पुढे पाहणं पसंत करेन. तसेच भारत मालदीवशी संबंध मजबूत करण्यासाठी काम करत आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, मोहम्मद मुइज्जू यांचे मेहुणे अब्दुल्ला बिन मोहम्मद इब्राहिम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करणारी पोस्ट केल्यानंतर आता ती पोस्ट सोशल मीडियावरून हटवली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मालदीवच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“भारताला मालदीवचा सर्वात विश्वासू मित्र असल्याचा अभिमान आहे. आपत्ती असो किंवा कोवीडची साथ असो, भारत नेहमीच फर्स्‍ट रेस्‍पोंडर म्हणून पाठीशी उभा राहिला आहे. मग जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा विषय असो किंवा कोविडनंतर अर्थव्यवस्था हाताळण्याचा, भारताने नेहमीच एकत्र काम केलं आहे. भारतासाठी मैत्री नेहमीच प्रथम असते. भारत मालदीवच्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी नेहमीच पाठिंबा देईल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य हे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालदीवला ५६५ दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या दौऱ्याच्या दरम्यान मालदीवसाठी तब्बल ५६५ दशलक्ष डॉलर्स लाइन ऑफ क्रेडिट देण्याची घोषणा केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि मालदीवमध्ये मुक्त व्यापार करारावरही चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले की, “विकासाच्या भागीदारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही मालदीवसाठी ५६५ दशलक्ष डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. मालदीवच्या लोकांच्या प्राधान्यांनुसार येथील पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांसाठी ही मदत वापरली जाईल”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.