PM Modi In Mansoon Session Of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांसमोर आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चाही उल्लेख केला. ते म्हणाले की, संपूर्ण जगाने भारताच्या लष्करी शक्तीचे, लष्करी क्षमतेचे रूप पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने ठरवलेले लक्ष्य १००% साध्य केले.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “जग भारताच्या ‘मेड इन इंडिया’ लष्करी शक्तीकडे आकर्षित झाले आहे. आजकाल जेव्हा जेव्हा मी जगातील लोकांना भेटतो, तेव्हा भारताने बनवलेल्या ‘मेड इन इंडिया’ शस्त्रांबद्दल जगाचे आकर्षण वाढत आहे, हे लक्षात येते.”
पहलगामच्या क्रूर घटनेने संपूर्ण जग हादरले. त्यानंतर पक्षाचे हित बाजूला ठेवून, आपल्या बहुतेक पक्षांचे प्रतिनिधी, बहुतेक राज्यांचे प्रतिनिधींनी देशाच्या हितासाठी जगभर दौरे केले. यामध्ये त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये दहशतवाद्यांचा सूत्रधार पाकिस्तानला उघड करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली.
याबाबात ते म्हणाले, “आज मी त्या सर्व खासदारांचे आणि सर्व पक्षांचे राष्ट्रीय हितासाठी केलेल्या या कामाबद्दल कौतुक करू इच्छितो, त्यामुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जगाने भारताचे विचार स्वीकारण्यासाठी आपले दरवाजे उघडले आहेत.”
मेड इन इंडिया लष्करी शक्ती
ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या लष्करी क्षमतेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, दहशतवाद्यांच्या मालकांची घरे २२ मिनिटांत उद्ध्वस्त करण्यात आली. मेड इन इंडिया लष्करी शक्तीच्या या नवीन स्वरूपाकडे जग खूप आकर्षित झाले आहे. आजकाल, जेव्हा जेव्हा मी जगातील लोकांना भेटतो तेव्हा भारताने बनवलेल्या मेड इन इंडिया शस्त्रांबद्दल जगाचे आकर्षण वाढत असल्यचे दिसत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
शुभांशू शुक्ला यांचे कौतुक
पंतप्रधान मोदींनी यावेळी पावसाळी अधिवेशन देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आणि जागतिक स्तरावर भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील ऐतिहासिक पाऊल हे भारताच्या प्रगतीशील अवकाश क्षमतांचे प्रतीक आणि राष्ट्रीय अभिमानाचे स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.