PM Modi Manipur Visit : मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष सुरू झाल्याच्या घटनेला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूरला पहिल्यांदाच भेट दिली. हिंसाचाराचे केंद्रस्थान राहिलेल्या चुराचंदपूर येथे २६० लोकांचा मृत्यू झाला होता, यानंतर मोदींनी येथे विस्थापित झालेल्यांची भेट घेतली.
मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांची योजना बदलावी लागली. ६५ किमी अंतर प्रवास रस्ते मार्गाने करत मोदी हे चुराचंदपूरमधील ‘पीस ग्राऊंड’ (Peace Ground) येथील मदत शिबिरात पोहोचले. यावेळी त्यांनी वृद्ध आणि मुलांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत राज्यपाल अजय कुमार भल्ला देखील होते.
चुराचंदपूर येथेच पहिल्यांदा हिंसाचार उफाळला होता, या ठिकाणी मुख्यत: कुकी-झो समुदायाचे लोक राहतात. मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी एका आदिवासी गटाने काढलेल्या रॅलीदरम्यान हा हिंसाचार सुरू झाला होता.
कुकी-झो (Kuki-Zo) गटांची मागणी आहे की जिथे त्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या जिल्ह्यांना केंद्रशासितप्रदेश जाहीर केले जावे. तर, मैतेई समुदाय हा इम्फाळ खोऱ्यात बहुसंख्य आहे.
चुराचंदपूर येथे पंतप्रधान मोदी यांनी १४ मोठ्या ७,३०० कोटी रुपये किमतीच्या विकास कामांचे भूमिपूजन केले, ज्यामध्ये ड्रेनेज फॅसिलिटी, महिलांचे वसतिगृह, शाळा आणि सुपर स्पेशालिटी हेल्थकेअर फॅसिलिटी यांचा समावेश आहे.
३ मे २०२३ रोजी मैतेई आणि कुकी-झो लोकांमध्ये पेटलेल्या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोक जखमी झाले आहेत तर ६०,००० हून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात सातत्याने हिंसाचार भडकत राहिला आहे. ज्यामुळे एन. बिरेन सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली.
मोदी या दौऱ्यावेळी पुढील भेट ही मैतेई बहुसंख्य इम्फाळला देणार आहेत. येथे देखील ते या संघर्षामुळे विस्थापित झालेल्यांची भेट घेतली. या शहरात हजारो कुकी लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय देण्यात आला आहे.
काँग्रेसची टीका
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौऱ्यामुळे शांतता आणि समरसतेला चालना मिळणार नसून, उलट हा दौरा हास्यास्पद ठरण्याची शक्यता आहे,’ अशी टीका काँग्रेसने शुक्रवारी केली. मोदी आज, शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या या दौऱ्यावर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘आता हे अधिकृत समजले आहे, की मोदी हे मणिपूरमध्ये तीस तास व्यतीत करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे शांततेला चालना मिळणार नसून, उलट तो हास्यास्पद ठरणार आहे.’
काँग्रेसने मोदींच्या या घाईघाईच्या दौऱ्यावर यापूर्वीही टीका केली होती. मोदींचा हा दौरा म्हणजे मणिपुरी जनतेचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. मणिपूरचे लोक २९ महिने पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असल्याची टीका काँग्रेसने केली होती.