गोरक्षकांकडून दलितांवर होत असलेल्या हिंसाचाराविरुद्ध प्रथमच मतप्रदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा लोकांची शनिवारी चांगलीच खरडपट्टी काढली. या तथाकथित गोरक्षकांपैकी बहुतांश लोक ‘समाजकंटक’ असून ते गोरक्षणाच्या नावावर दुकानदारी चालवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी या लोकांची कानउघाडणी केली.
उत्तर प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेश यासह देशात निरनिराळ्या राज्यांमध्ये तथाकथित गोरक्षकांनी गाईंचे संरक्षण करण्याच्या नावावर दलित व मुस्लिमांना मारहाण केल्याच्या घटनांबाबत मोदी सरकार व भाजप यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी प्रथमच या विषयावर आपले मौन सोडले.
या तथाकथित गोरक्षकांपैकी ८० टक्के लोक रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर कामे करतात आणि दिवसा गोरक्षक बनतात. त्यामुळे त्यांच्या बाबतची संपूर्ण माहिती गोळा करावी, असे पंतप्रधानांनी राज्य सरकारांना सांगितले. गाईंच्या मदतीसाठी गट चालवणे याचा अर्थ इतरांचा छळ करणे असा होत नसल्याची तंबीही त्यांनी दिली.
आपल्या सरकारच्या ‘मायगव्ह’ या उपक्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोदी यांनी देशवासीयांशी साधलेल्या थेट संवादात गोरक्षकांचा जाहीररीत्या तीव्र निषेध केला. पाश्चिमात्य देशांमध्ये राजकीय नेते किंवा एखाद्या कंपनीचे सीईओ लोकांना सहसा ज्या प्रकारे संबोधित करतात, त्या ‘टाऊन हॉल’ पद्धतीने मोदी यांनी हा संवाद साधला.
लोक गोरक्षणाच्या नावावर ज्या पद्धतीने आपली दुकाने चालवतात, त्यामुळे मला राग येतो. यापैकी बहुतांश लोक गोरक्षणाच्या मुखवटय़ाखाली अवैध धंदे करणारे समाजकंटक आहेत. यांच्यापैकी ८० टक्के लोक समाजविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आढळतील आणि कुठल्याच समाजाला हे मान्य होण्यासारखे नाही, असे मोदी म्हणाले.