अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला विनाकारण त्रास देत असून त्यांनी भारतावर लादलेले टॅरिफ हा द्वीपक्षीय संबंधामधील मोठी चूक आहे. ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लावला होता, त्यानंतर यात २५ टक्क्यांची आणखी वाढ केली. रशियाकडून तेल आयात केल्यामुळे भारताला दंड लावल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांचे माजी सहकारी जॉन बोल्टन म्हणाले की, ट्रम्प यांचा दृष्टीकोन मागासलेला आणि दोन्ही देशांमधील संबंध बिघडवणारा आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी करावी, असा सल्लाही बोल्टन यांनी दिला.

दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी मात्र त्यांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. रशिया-युक्रेन यांच्यात चाललेल्या युद्धात भारत रशियाची मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी तर करतोच, शिवाय खरेदी केलेले बहुतेक तेल खुल्या बाजारात विकून त्यापासून नफा कमावत आहे. रशियाच्या युद्धामुळे युक्रेनमधील किती लोक मारले जात आहते, याची त्यांना पर्वा नाही”, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर शेअर केली होती.

बोल्टन यांनी म्हटले की, चीनही रशियाकडून तेल आयात करतो. पण त्यांना भारताप्रमाणे वाढीव टॅरिफ किंवा दंडाचा सामना करावा लागलेला नाही. युक्रेनमध्ये युद्धबंदी करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे भारताला त्रास सहन करावा लागत आहे, असेही ट्रम्प यांनी नमूद केले. एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी चीनविरोधात भरमसाठ टॅरिफ लादले होते. मात्र त्यानंतर त्यांनी चीनबरोबर तणाव वाढणे टाळले. आता त्यांचे मुख्य लक्ष्य भारत बनले आहे.

https://truthsocial.com/@realDonaldTrump/115021272837599192

बोल्टन यांनी इशारा दिला की, टॅरिफ वाढीमुळे होणारे परिणाम दुरुस्त करण्यासाठी बराच वेळ जाईल. “मागच्या ३० दिवसांत व्हाईट हाऊसने भारताशी ज्या पद्धतीने व्यवहार केला आहे, त्यासारखी मोठी चूक नाही. यामुळे गमावलेला विश्वास पुन्हा मिळविण्यात बराच वेळ जाईल”, असेही बोल्टन म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकित करावे

बोल्टन यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत ट्रम्प यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर हे ट्रम्प यांना खेळवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा पंतप्रधान मोदींना सल्ला राहिल की, त्यांनी ट्रम्प यांना नोबेलसाठी दोनवेळा नामांकित करण्याचा प्रस्ताव द्यावा.

पाकिस्तानने नोबेलसाठी केली शिफारस

जूनमध्ये भारताने राबविलेले ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात यावा, अशी शिफारस पाकिस्तानने केली आहे.