PM Modi speaks to Russian president Vladimir : रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे. यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबरोबरच मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण देखील दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी खूप चांगला आणि विस्तृत संवाद झाला. युक्रेनसंबंधी ताज्या घडामोडींबद्दल माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. याबरोबरच आम्ही आपसातील द्विपक्षीय अजेंड्याच्या प्रगतीचा आढावा देखील घेतला आणि भारत-रशिया ही खास आणि विशेष धोरणात्मक भागीदीरी आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या वर्षाच्या अखेरीस अध्यक्ष पुतिन यांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याबरोबरच पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना या वर्षाच्या अखेरीस वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण देखील दिले.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याच्या आधी एका दिवलापूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांन पुतिन यांची भेट घेतली होती. पुतिन आणि एनएसए अजित डोवाल यांची ही भेट क्रेमलिन येथे झाली.

ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर रशियाने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. “सार्वभौम देशांना त्यांचे व्यापारी भागिदार स्वतः निवडण्याचा अधिकार आहे, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमीत्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे. तसेच इतर देशांना रशियाबरोबरचे व्यापारी संबंध तोडण्यास भाग पाडणे हे बेकायदेशीर आसल्याची टीका देखील त्यांनी अमेरिकेवर केली.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्रम्प यांच्या टॅरिफवर प्रतिक्रिया देताना गुरुवारी शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांचे हित बाजुला ठेवून त्यांचे सरकार कधीही तडजोड करणार नाही. त्यासाठी वैयक्तिकरीत्या खूप मोठी किंमत मोजावी लागली तरी त्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.