PM Modi Special Act For Ram Mandir Workers: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या गाभाऱ्यात राम लल्लाच्या मूर्तीची ‘प्राण प्रतिष्ठा’ केली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत मोदींनी प्राणप्रतिष्ठा विधीत भाग घेतला. यानंतर मोदींनी ११ दिवसांचे अनुष्ठान प्रभू रामाचे चरणामृत प्राशन करून आपला उपवास सोडला. अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी नवीन अयोध्या मंदिरात प्रभू रामांना दंडवत केले. या भव्यदिव्य समारंभानंतर केलेल्या भाषणात मोदींनी अनेकांचे कौतुक केले तर अनेकांचे आभारही मानले. यावेळी मोदींनी राम मंदिराच्या बांधकामातील कर्मचाऱ्यांसाठी केलेली कृती लक्षवेधी ठरली. याचाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानंतर ७००० हुन अधिक भक्तांसह बोलताना मोदी म्हणाले की, “राम लल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आपल्या रामाचे आगमन झाले आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस प्रभू राम (त्यांच्या निवासस्थानात) आले आहेत. कित्येक वर्षाच्या धैर्य, बलिदानानंतर अखेरीस आज प्रभू राम आले आहेत. २२ जानेवारी हा दिवस एका नव्या युगाची सुरुवात म्हणून इतिहासात नोंदवला जाईल. राम मंदिराच्या उभारणीने लोकांमध्ये एक नवीन ऊर्जा भरली आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी निकाल देऊन मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचेही मोदींनी आभार मानले. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. न्याय केल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. हे मंदिर कायद्याला धरून बांधण्यात आले आहे. “
या भाषणाच्या नंतर मोदींनी कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुलाबपुष्पांची वृष्टी केली. हातात परडी घेऊन मोदी कामगारांच्या रांगांमधून फिरत होते आणि या गुलाबाच्या पाकळ्यांनी कामगारांवर वर्षाव करत होते. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी पंतप्रधानांच्या नम्रतेचे तसेच सर्वांना सामावून घेण्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान यापूर्वी माध्यमांशी बोलताना या कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. कामगार म्हणाले होते की, “आम्हाला याचेच कौतुक आहे ही आम्ही रामाचे मंदिर बांधत आहोत. आम्हाला अजिबातच थकवा जाणवत नाही. आम्ही आम्ही २४- २४ तास काम करूनही स्वतःला थांबवू इच्छित नाही. जर कधी थकवा वाटलाच तर फक्त एकदा रामाच्या नावाचा जयघोष करायचो आणि अचानक उत्साह व ऊर्जा जाणवायची. “
अयोध्येतील राम मंदिराची वैशिष्ट्ये
पारंपारिक नगारा शैलीत बांधलेल्या राम मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असलेले हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला २० फूट उंच आहे.