कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते. आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असं अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केलं. जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा आणखी एक भाग खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे.
कानपूर मेट्रो इतकी महत्त्वाची का?
कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे. शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच या प्रकल्पाचं उद्धाटन झाल्याने निवडणुकीतही याचा फायदा होणार हे निश्चित. गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या अनेक कामांची पाहणी तसंच उद्घाटन केलं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गंगा एक्सप्रेसवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. गेली दोन वर्षे या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं. उत्तरप्रदेशात त्यांनी प्रथम आयआयटी कानपूरच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली. त्यानंतर आता ते बिना पनकी मल्टी प्रॉडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचं उद्घाटन करतील.