तांत्रिकाची भेट घेऊन, जादूटोणा करून कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला नरेंद्र मोदी यांनी आज नीतिशकुमारांना हाणला. बिहार चालवण्यासाठी तांत्रिकाची गरज नाही, त्याकरिता लोकशाहीची सक्षम आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढारलेला बिहार हवा असेल तर त्याकरिता तुम्हाला मागासलेल्या बिहारला हरवावेच लागेल, असे आवाहन करत नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केले.
बिहारमध्ये २८ ऑक्टोबरला तिस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या चार सभा घेतल्या जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या सभेत नीतिश कुमारांवर जोरदार हल्ला चढवला. ‘महास्वार्थबंधन’ मध्ये तीन नव्हे चार खेळाडू आहेत. त्यात पहिले लालू, दुसरे नीतीश, तिसर्‍या सोनिया आणि चौथे हे मांत्रिक आहेत. लोकशाही जादू-टोण्यावर चालत नाही. १८ व्या शतकाच्या मानसिकेतेचा लोक २१ व्या शतकात सरकार चालवू शकत नाहीत. पुढे ते म्हणाले की, ‘लालू स्वत:ला मोठा मांत्रिक समजतात. लालूंनी काळे कबूतर कापा, पांढरे कबूतर कापा, मिर्चीचा धूर करा, त्यांचा आमच्यावर काहीच फरक पडत नाही. जर लालूंना हेच करायचे असेल तर, आपल्या पक्षाचे नाव बदलून ‘राष्ट्रीय जादू टोना दल’ असे ठेवावे. नितीश-लालू यांनी कितीही चिखलफेक केली तरी कमळ चिखलातच फुलतं हे ध्यानात ठेवा, असेही मोदींनी सुनावले.
वीज, पाणी आणि चांगले रस्ते हा आमचा बिहारसाठी त्रिसूत्री कार्यक्रम असून शिक्षण, रोजगार आणि औषधे हे आमचे व्हिजन असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.  आजची ही रॅली म्हणजे केवळ एक सभा नसून परिवर्तनाचा संकल्प करण्यासाठीचा महामेळावा आहे. ही निवडणूक फक्त बिहारला नव्हे तर संपूर्ण देशालाही दोनवेळा दिवाळी साजरी करण्याची संधी देणार असल्याचे सांगत त्यांनी बिहारमध्ये भाजपालाच विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.