गुरू तेग बहादूर यांच्या जीवनातून प्रेरणा : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अचानक रकाब गंज गुरुद्वारा  येथे भेट देऊन प्रार्थना केली. गुरू तेग बहादूर हे शीखांचे नववे गुरू होते.  त्यांचा अंत्यविधी गुरुद्वारा रकाब गंज येथे झाला होता. तेथे  मोदी यांनी गुरुद्वाराला भेट देऊन प्रार्थना केली, त्यासाठी कुठलाही पोलिस बंदोबस्त नव्हता किंवा वाहतुकीतही बदल करण्यात आला नव्हता. नेहमीप्रमाणे पंतप्रधानांच्या भेटीसाठी रस्त्यावर सामान्य माणसांसाठी वाहतूक अडथळे लावण्यात आलेले नव्हते.

पंतप्रधान मोदी यांनी या भेटीबाबत ट्विट संदेश पाठवला असून त्यात म्हटले आहे,की आज सकाळी आपण ऐतिहासिक गुरुद्वारा रकाब गंज साहिब येथे भेट दिली. तेथे गुरू तेग बहादूरजी यांच्या पवित्र पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. जगातील लाखो लोकांप्रमाणेच श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळते.  मोदी यांनी पंजाबी भाषेतूनही ट्विट संदेश पाठवला असून त्यात म्हटले आहे, की गुरू तेगबहादूर यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मोठा त्याग केला होता व त्यांनी वैश्विक बंधुत्वाचा संदेश दिला.

गुरू तेगबहादूर यांना मुघलांनी त्यांचे आदेश न पाळल्याने मृत्युदंड दिला होता. मोदी यांनी म्हटले आहे, की तेगबहादूर   यांचे ४०० वे प्रकाशपर्व सरकार विशेष कार्यक्रम आयोजित करुन साजरे करणार आहे.  हे पर्व ऐतिहासिक पद्धतीने साजरे करून श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या आदर्शांचा अंगीकार केला पाहिजे.