PM Modi Says New Bharat Does Not Fear Any Nuclear Threat : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ व्या वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. हा नवीन भारत आहे आणि तो कोणाच्याही अण्वस्त्र धमक्यांना घाबरत नाही असेही पंतप्रधान मोदींनी ठणकावले. तसेच भारताच्या वीर जवानांना पाकिस्तानला काही क्षणांमध्ये गुढघ्यावर आणले असेही मोदी म्हणाले.

मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज देश मा भारतीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देतो. पाकिस्तानहून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या माता-बहि‍णींचा सिंदूर पुसला होता. आपण ऑपरेशन सिंदूर करून दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. आपल्या वीर जवानांनी काही क्षणांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदींनी जैश ए मोहम्मदच्या कमांडरच्या एका व्हिडीओचा दाखाला दिला या व्हिडीओमध्ये जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरीने ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचं सांगितले आहे. मोदी म्हणाले की, कालच देश आणि जगाने पाहिले की पुन्हा एका पाकिस्तानी दहशतवाद्याने रडत-रडत परिस्थिती सांगितली… हा नवीन भारत आहे, हा कोणाच्याही अण्वस्त्र धमक्यांना घाबरत नाही. हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हैदराबाद लिबरेशन डे

नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना हैद्राबाद मुक्ती दिनाची देखील आठवण काढली. ते म्हणाले की, आज १७ सप्टेंबर रोजी एक आणखी ऐतिहासिक दिवस आहे. आजच्याच दिवशी देशाने सरदार पटेल यांच्या पोलादी इच्छा शक्तीचे उदाहरण पाहिले होते. भारतीय लष्कराने अनेक अत्याचारांपासून मुक्त करून त्यांच्या अधिकारांची रक्षण करत भारताचा गैरव पुन्हा प्रस्थापित केला होता.

देशाच्या इतक्या मोठ्या यशाला आणि लष्कराच्या इतक्या मौठ्या शौर्याला अनेक दशकं लोटली मात्र कोणी आठवण काढणारे नव्हतं. पण तुम्ही मला संधी दिली. आमच्या सरकारने १७ सप्टेंबर, सरदार पटेल आणि हैदराबादची घटनेला अमर केले आहे, असेही मोदी म्हणाले.

आम्ही भारताच्या एकतेचे प्रतिक या दिवसाला ‘हैदराबाद लिबरेशन डे’ म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. आणि आज हैदराबादमध्ये मोठ्या उत्साहाने लिबरेशन डेचा कार्यक्रम देखील केला जात आहे. हैदराबाद लिबरेशन डे आपल्याला प्रेरणा देतो, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या शपथ घेऊन आपल्या स्वतंत्रता सेनेने त्यांचे सर्वकाही देशाला समर्पित केले होते. त्या सर्वांचे स्वप्न विकसित भारत हे होते. त्यांची इच्छा होती की भारत गुलामीच्या बेड्या तोडून वेगाने पुढे जावा. आज त्याच प्रेरणेने भारताच्या १४० कोटी लोकांनी विकसित भारत बनवण्याचा संकल्प घेतला आहे आणि या प्रवासाचे ४ प्रमुख स्तंभ आहेत, ते म्हणजे नारी शक्ती , युवा शक्ती, गरीब आणि शेतकरी, असे मोदी म्हणाले. आज या कार्यक्रमात विकसित भारताच्या या चारही स्तंभाना नवी मजबूती देण्याचे काम झाले आहे असेही मोदी म्हणाले.