पीटीआय, नवी दिल्ली
‘‘पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांची क्रूर हत्या केली. या घटनेमुळे देशभर आक्रोश निर्माण झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्या आक्रोशाची अभिव्यक्ती होती. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये आम्ही फरक करत नाहीत. पाकिस्तानने पुन्हा कुरापत काढली, तर त्यांना पुन्हा धडा शिकवला जाईल,’’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिला.
स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले. पाकिस्तानला असा धडा शिकवला गेला की, त्यांची अजूनही झोप उडाली आहे. दहशतवादी आणि त्यांना सुरक्षित आश्रय देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेजारी राष्ट्राकडून भविष्यात कोणताही गैरप्रकार घडल्यास भारतीय सशस्त्र दल शिक्षा करण्याचा निर्णय घेतील. पुन्हा कुरापत काढली तर पुन्हा धडा शिकवला जाईल. हाच ‘न्यू नॉर्मल’ असून अणुबॉम्बचे ‘ब्लॅकमेलिंग’ आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला.
मोदींनी सिंधूपाणी करार संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. तसेच भारताच्या लढाऊ विमान कार्यक्रमासाठी जेट इंजिन विकसित करण्याची गरज अधोरेखित केली, संरक्षण उत्पादन क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले.
३.५ कोटी रोजगार
देशातील ३.५ कोटी युवकांना रोजगार देणारी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना शुक्रवारपासून लागू झाली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. १ लाख कोटींच्या या योजनेमध्ये खासगी क्षेत्रात पहिल्यांदाच नोकरी मिळालेल्या युवकांना १५ हजार रुपये सरकारकडून दिले जातील. कंपन्यांनाही प्रोत्साहन निधी दिला जाईल, अशी माहिती मोदींनी दिली.
‘सुदर्शन चक्र’ची सुरक्षा
देशातील रुग्णालये, रेल्वे, धार्मिक स्थळे अशा महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी ‘सुदर्शन चक्र’ मोहीम राबवली जाणार असल्याची घोषणा मोदींनी केली. पाकिस्तान व इतर शस्त्रू राष्ट्रांकडून असलेल्या संभाव्य धोक्यापासून नागरी ठिकाणांच्या संरक्षणासाठी ही योजना आखली जात आहे. पुढील वर्षांत २०३५ पर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षाकवच तयार केले जाईल. बदलत्या युद्धपरिस्थितीनुरूप ही सुरक्षा व्यवस्था असेल, असे मोदी म्हणाले.
यही समय है, सही समय है…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात कविता सादर करत स्वावलंबी होण्याची आणि ‘समृद्ध भारत’साठी काम करण्याची हीच योग्य वेळ असल्याचा संदेश दिला. ‘परिश्रम मैं जो तप है, उसने ही इतिहास रचा है, जिसने फौलादी छट्टानो को तोडा है, उसने ही समय को मोडा है, समय को मोड़ देने का भी, यही समय है, सही समय है’, अशी कविता मोदींनी आपल्या भाषणात सादर केली.
‘स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लवकरच’
या वर्षाच्या अखेरीस भारतात बनवलेली पहिली सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. सध्या देशात सहा सेमीकंडक्टर उत्पादन कंपन्या भारतात आहेत. आता भारतीय नागरिकांनी बनवलेल्या, भारतात बनवलेल्या चिप बाजारात येतील, असे मोदी म्हणाले.
आपल्या देशाने गेल्या अनेक दशकांपासून दहशतवाद सहन केला आहे. देशाचे अंतरात्म्याला वारंवार वेदना दिल्या आहेत. आता आपण एक नवीन परंपरा स्थापित केली आहे. जे दहशतवादाला पोसतात आणि आश्रय देतात, जे दहशतवाद्यांना बळकटी देतात, त्यांना आता धडा शिकवला जाईल.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान