नोटाबंदीचा निर्णयानंतर देशातील जनतेला होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज नवनवीन घोषणा करत आहेत. जनतेचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना, यावरून काँग्रेसने मोदींवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज काळे धन पांढरे करण्याची योजना आणत आहेत. यालाच म्हणतात मोदींची फेअर अॅण्ड लव्हली स्कीम, अशा शब्दांत काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.
Modi ji roz ek kaale dhan ko gora banane ki scheme launch kar dete hain, ise kehte hain Modi ki Fair & lovely scheme: RS Surjewala, Congress pic.twitter.com/qQAo94sQ98
— ANI (@ANI) November 26, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जनतेला नोटा बदलून घेण्यासाठी आणि त्या बँकेत जमा करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. मोदी यांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वत्र गोंधळ उडाला. मोदी यांच्या एका निर्णयाने जनतेला रस्त्यावर यावे लागले, अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली. नोटाबंदीच्या निर्णयावरून सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला. पंतप्रधानांनी सभागृहात येऊन चर्चा करावी, असा आग्रह विरोधकांनी धरला आहे. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आल्याने प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे संसद सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. संसदेत सरकारची कोंडी करण्यात यशस्वी झालेले विरोधक आता संसदेबाहेरही सरकारवर सडकून टीका करत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयावरून टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करणारे विरोधक सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांवरही टीका करू लागले आहेत. काँग्रेसनेही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी काळे धन पांढरे करण्यासाठी रोज एक योजना जाहीर करत आहेत. याला म्हणतात मोदींची फेअर अॅण्ड लव्हली योजना, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ता सुरजेवाला यांनी केली आहे. सुरजेवाला यांच्या या टीकेला भाजप कोणत्या शब्दांत उत्तर देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजपने नोटाबंदीच्या निर्णयाआधीच बिहारमध्ये ठिकठिकाणी जमिनी खरेदी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काळ्या पैशांवरून खासदार पप्पू यादव यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. प्रत्येक पक्षाकडे काळा पैसा आहे. भाजपने आपल्या काळ्या पैशांची आधीच व्यवस्था केली आहे, असा आरोप यादव यांनी केला आहे.