पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ या ठिकाणी भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना अंगणवाडी शाळांमध्ये खजूर आणि इतर फळं वाटण्याचाही सल्ला दिला आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान म्हणाले, बुथ कार्यकर्ते जी मेहनत घेतात त्याची पूर्ण माहिती मला मिळत असते. मी अमेरिका आणि इजिप्तमध्ये होतो त्यावेळीही तुमच्या प्रयत्नांची माहिती मला मिळत होती.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्यांचा आरोप आहे. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि यांच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा (इतर घोटाळे बाहेर काढावे).

हे ही वाचा >> “एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर…”, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्हाला गांधी परिवारातल्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा. तुम्हाला मुलायमसिंह यादव यांच्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही समाजवादी पार्टीला मतदान करा. तुम्हाला लालू प्रसाद यादव यांच्या मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर तुम्ही राजदला (राष्ट्रीय जनता दल) मतदान करा. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. तुम्हाला अब्दुल्ला परिवारातील मुला-मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही नॅशनल कॉन्फरन्सला मतदान करा. तुम्हाला के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही बीआरएसला मतदान करा. तुम्हाला करुणानिधी यांच्या मुला-मुलीचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही डीएमकेला मतदान करा. परंतु माझ्या एका गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलींचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा.