PM Modi after Donald Trump Dead Economy Remark: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत आणि रशियाला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधले होते. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर आणि दंडाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे बोलत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे. तसेच देशातील लोकांनी यापुढे नवीन वस्तू घेताना स्वदेशी मालाला पसंती द्यावी, स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात, असे आवाहनही मोदी यांनी केले.
डोनाल्ड ट्रम्प यांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. भारताने आपल्या आर्थिक हितसंबंधाबद्दल जागरूक राहायला हवे. तसेच स्वदेशी उत्पादनांवर भर देत पुढे गेले पाहिजे.”
जागतिक पातळीवर अस्थिरता
वाराणसी येथे बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. सर्व देश त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधावर लक्ष देत आहेत. भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहे. त्यामुळेच भारतालाही त्याच्या आर्थिक हितसंबंधाबद्दल अधिक सतर्क राहावे लागेल.”
यापुढे फक्त स्वदेशी वस्तू विकत घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “आपले सरकार देशाच्या विकासासाठी जे काही करू शकते, ते करत आहे. ज्यांना देशाचा विकास करायचा आहे आणि ज्यांना भारताला जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून पाहायचे आहे. त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून स्वदेशी उत्पादनांसाठी आग्रही राहिले पाहिजे. यासाठी कोणताही राजकीय पक्ष असो, राजकीय नेता असो… त्यांनी मतभेद बाजूला ठेवून स्वदेशीचा संकल्प स्वीकारला पाहिजे.”
‘त्या’ स्वदेशी वस्तू आहेत
स्वदेशीचा संकल्प कसा करायचा याचीही माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. ते म्हणाले, “ज्या वस्तू बनविण्यासाठी भारतीय माणसाचे हात लागले आहेत. भारतीय व्यक्तीने वस्तू बनवताना आपला घाम गाळला आहे. अशा वस्तू स्वदेशी आहेत. आपण मेक इन इंडिया वस्तूच विकत घेतल्या पाहिजेत, असा संकल्प करूया. आतापासून जे काही नवीन सामान आपण घेऊ, ते स्वदेशीच असले पाहिजे.