देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल मोदींनी देखील समाज माध्यमांवरून ट्रम्प यांचे आभार मांडले आहेत. या फोनवरील संभाषणामध्ये युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींकडून पाठिंबा ही देण्यात आल्याची माहिती आहे. तर तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागिदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट काय?

पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की , “माझ्या मित्रा, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या फोन कॉलबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या पुढाकाराचे आम्ही समर्थन करतो.”

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. ही बैठक सुमारे सात तास चालली, जी दोन्ही देशांनी सकारात्मक असल्याचे वर्णन केले. अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, द्विपक्षीय व्यापार चर्चेवरील ही बैठक सकारात्मक होती.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय नेते शुभेच्छा देत आहेत. देशभरात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात भारत देश वैश्विक आकाक्षांचं केंद्र झाला आहे. अंतराळातील चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवापासून समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेपर्यंत त्यांनी परंपरा आणि विज्ञान यांचा गौरव केला आहे. अमित शाह यांच्या प्रमाणेच शरद पवार, चंद्राबाबू नायडू आणि इतर दिग्गजांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.