सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आसाममध्ये सुरु असलेलं आंदोलन अद्यापही सुरु असून यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम दौरा रद्द केला आहे. नरेंद्र मोदी खेलो इंडिया यूथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार होते. मोदींचा हा प्रस्तावित दौरा होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला असून एका महिन्यात दुसऱ्यांदा असं घडलं आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारकडून यासंबंधी निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदी युथ गेम्सच्या उद्घाटनासाठी येणार नाहीत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी मोदींना २२ जानेवारीला होणाऱ्या सांगता समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात येण्यासंबंधी चर्चा होणार आहे”.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार असून काही नियोजित कार्यक्रम आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने आसामचा दौरा रद्द करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यूथ गेम्सचं उद्घाटन करणार होते. मात्र ती योजनाही रद्द करावी लागली आहे.

खेलो इंडिया यूथ गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं”. पीआयबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू उद्घाटन सोहळ्यासाठी काही स्टार खेळाडूंसोबत उपस्थित असणार आहेत.

याआधी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून हिंसाचार सुरू असल्याने जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट रद्द करण्यात आली होती. नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्यात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार होती. गुवाहाटीत ही नियोजित भेट होणार होती. पण ही भेट रद्द करावी लागली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi caa citizenship act khelo india youth games assam aasu sgy
First published on: 09-01-2020 at 09:54 IST