पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं. तसेच आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहिती होतं, असं मत मोदींनी यावेळी व्यक्त केलं. तसेच भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या प्रयत्नांची शक्ती दिसते, असंही नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपल्या लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या प्रयत्नांची शक्ती दिसते. मला माझ्या देशातील नागरिकांच्या क्षमतेची पूर्ण कल्पना आहे. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहिती होतं. उत्तराखंडच्या पूनम नौटीयाल यांनी कोरोना लसीकरण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.”

“बागेश्वरमधील पुरातन मंदिरांचं बांधकाम पाहून प्रभावित झालो”

पूनम नौटीयाल बागेश्वर येथील रहिवासी आहेत. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, “मला बागेश्वरला यायला मिळालं हे माझं नशिब होतं. ते ठिकाण एक प्रकारे तिर्थक्षेत्र आहे. तिथं पुरातन मंदिरं आहेत. अनेक वर्षांपूर्वी लोकांनी तिथं कसं काम केलं असेल हे पाहून मी खूप प्रभावित झालो होतो.”

हेही वाचा : मोदी सरकाराच्या काळात ३५ हजार उद्योजक हे देश सोडून गेले, पं. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांची टीका

“येत्या रविवारी (31 ऑक्टोबर) सरदार पटेल यांची जयंती आहे. ‘मन की बात’च्या प्रत्येक श्रोत्यांच्या वतीने आणि माझ्यावतीने मी लोहपुरूषाला नमन करतो. एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या ना कोणत्या उपक्रमात सहभागी होणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

“भारताने कायमच जागतिक शांततेसाठी प्रयत्न केले”

पुढील महिन्यात भारत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देखील साजरी करेल. त्यांच्या जीवनातून आपल्याला स्वतःच्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगणे, पर्यावरणाची रक्षा करणे, अन्यायाविरुद्ध लढणे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आज संयुक्त राष्ट्र दिवस देखील आहे. या निमित्ताने भारताने जागतिक शांतता आणि जागतिक कल्याणासाठी दिलेलं योगदान आठवण्याची गरज आहे. भारताने कायमच जागतिक शांततेसाठी प्रयत्न केलेत.

भारत योगा आणि पारंपारिक पद्धतींना अधिक लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या पृथ्वीला अधिक चांगलं ठिकाण बनवण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल.

“पोलीस दलात महिलांची संख्या वाढत आहे”

यावेळी मोदींनी पोलीस दलात महिलांची संख्या वाढत असल्याचंही सांगितलं. तसेच भारतात ड्रोनवर अनेक निर्बंध असल्याचं सांगत त्यांनी आता हे चित्र बदलत असल्याचं म्हटलं. नवं ड्रोन धोरण चांगला परिणाम दाखवत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

मोदी म्हणाले, “नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजली तरच याला यश येईल. त्यामुळे दिवाळीत आपल्या घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिल यासाठी देखील प्रयत्न करा. स्वच्छता म्हटलं की Single Use Plastic पासून मुक्तीची गोष्ट विसरून चालणार नाही. स्वच्छता अभियानातील उत्साह कमी होऊ देऊ नका. आपल्या सर्वांना मिळून देश पूर्णपणे स्वच्छ ठेवायचा आहे.”