PM Modi on Israeli Strikes in Qatar: कतारची राजधानी दोहा येथे इस्रायली लष्कराने मंगळवारी हल्ला केला होता. हमासच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्यासाठी हवाई हल्ला केल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले होते. यानंतर भारताने आता या हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले की, कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी मी संवाद साधला. दोहा येथे झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच शांतता, स्थिरता आणि संवाद घडविण्यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये सविस्तर लिहिल्याप्रमाणे, “कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी चर्चा केली. कतार आमच्यासाठी बंधूतुल्य राष्ट्र असून त्यांच्या सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. संवाद आणि मुत्सद्देगिरीतून समस्या सोडविणे आणि तणाव दूर करणे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. भारत नेहमीच या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला प्राधान्य देत आला असून दहशतवादाच्या विरोधात नेहमीच ठाम भूमिका घेत आला आहे.”
पंतप्रधान मोदी आणि अमीर यांच्यात काय चर्चा झाली?
शांतता प्रस्थापित करण्यासाठी कतारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले. गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांची सुटका करण्याच्या उद्देशाने कतारने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, याचीही मोदींनी स्तुती केली. शेख तमीम यांनी भारताने दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
इस्रायलने मंगळवारी कतारची राजधानी दोहा येथे हवाई हल्ले केले होते. हमासचे वरिष्ठ नेते एकेठिकाणी जमले असल्याचा आरोप करत इस्रायली लष्कराने हवाई हल्ले केले होते. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी या हल्ल्याची जबाबदारी उचलली होती.
या हल्ल्यानंतर हमासने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. ज्यात त्यांनी म्हटले की, हमासच्या काही नेत्यांचा या हल्ल्यातून जीव वाचला आहे. मात्र इतर पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. कतारने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एक सुरक्षा कर्मचारी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडला.
दुसरीकडे अमेरिकेने म्हटले की, कतारवर हल्ला करणार असल्याची माहिती इस्रायलने अमेरिकेला दिली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या हल्ल्याला पाठिंबा देत नाहीत. दोह्यातील इस्रायलच्या हल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन आणि सौदी अरेबिया या देशांच्या नेत्यांनी कतारला अनपेक्षित भेटी देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.