PM Narendra Modi on Nepal Protest: गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड उलथापालथी होत आहेत. सोशल मीडियावरील बंदीवरून सुरू झालेलं Gen Z तरुणांचं आंदोलन बघता बघता संपूर्ण देशभर पसरलं आणि शेवटी पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलं. नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ झाली. माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. आता या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नेपाळमधील घटनाक्रम ऐकल्यानंतर प्रचंड वेदना झाल्याचं मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींचं आंदोलक तरुणांना आवाहन
सरकारमधील भ्रष्टाचाराचं व्यापक कारण आणि सोशल मीडियावरील बंदीचं तात्कालिक कारण नेपाळमधील परिस्थितीला कारणीभूत ठरलं. यामध्ये नेपाळमधलं सरकार कोसळलं असून नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली चालू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींनी नेपाळमधल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मोदींनी यावर भूमिका मांडली आहे.
“आज हिमाचल प्रदेश व पंजाबच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर सुरक्षेसंदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेपाळमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नेपाळमध्ये झालेली हिंसा हृदयद्रावक आहे. यात अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याचं ऐकून फार वाईट वाटलं. नेपाळमध्ये स्थैर्य, शांतता व समृद्धी प्रस्थापित होणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बांधवांना विनम्र आवाहन करतो की त्यांनी शांतता, कायदा व सुव्यवस्थेचं पालन करावं”, असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेपाळमध्ये हिंसाचार टोकाला
दरम्यान, नेपाळमध्ये रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला जात असल्याचं दिसत आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नेपाळच्या संसदेला आंदोलकांनी आग लावली होती. मंगळवारी याचा पुढचा टप्पा आंदोलकांनी गाठला. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आंदोलकांनी आग लावली.
नेपाळमधील परिस्थितीवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा असं सांगत पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आधीच राजीनामा दिला होता. त्यांच्यापाठोपाठ काही तासांत राष्ट्रपतींनीदेखील राजीनामा दिला.

एकीकडे नेपाळमधील सरकार कोसळत असताना दुसरीकडे त्यांची शासकीय निवासस्थाने आंदोलकांच्या भक्ष्यस्थानी पडत होती. हिंसक झालेल्या आंदोलकांनी संसदेप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाची इमारत, पंतप्रधानांचे निवासस्थान, मंत्र्यांची निवासस्थाने आणि सरकारच्या इतर काही महत्त्वाच्या इमारतींना आग लावली. धक्कादायक बाब म्हणजे माजी पंतप्रधानांच्या पत्नीला आंदोलकांनी जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
नेपाळमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली
आधीचे सरकार आणि त्यांच्याशी संबंधित सर्व यंत्रणा उद्ध्वस्त केल्यानंतर आता नेपाळमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी जेनझी आंदोलकांकडून केली जात आहे.

दुसरीकडे नेपाळमधील विरोधी पक्षांची काही प्रमुख नेतेमंडळीही यासाठी तयारी करत असल्याचं समोर आलं आहे. नेपाळमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होणं आवश्यक असल्याचं मत आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.