PM Narendra Modi flags of Maruti e Vitara : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज (२६ ऑगस्ट) त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून त्यांनी अहमदाबादमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या नव्या कारला हिरवा झेंडा दाखवला. तसेच अहमदाबादमधील मारुती सुझुकीच्या नव्या प्लान्टचं उद्घाटन केलं.
मोदी यांनी मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार ‘मारुती ई विटारा’ला (Maruti e Vitara) हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांनी अहमदाबादमधील हन्सलपूरस्थित प्लान्टमधील हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादन विभागाचं उद्घाटन केलं. येथेच मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं उत्पादन केलं जाणार आहे.
मारुतीची कार जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार
भारतात तयार झालेली ही कार जपान, युरोपसह जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पाठवली जाणार आहे. भारतात तयार झालेल्या इलेक्ट्रिक कारची जगभर निर्यात केली जाईल. पंतप्रधान मोदी यांनी मारुती सुझुकीच्या या प्लान्टमध्ये आजपासून कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार मारुती ई विटाराच्या उत्पादनासाठीच्या असेम्बली लाइनचं उद्घाटन केलं. म्हणजेच आजपासून या प्लान्टमध्ये मारुतीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे.
मारुतीच्या कारची बॅटरी भारतातच तयार होणार
मारुतीची इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार झाल्यानंतर ती भारतात तर विकली जाणार आहे, यासह ही कार जगभरातील अनेक देशांमध्ये निर्यात केली जाईल. तसेच देशात बॅटरी इकोसिस्टिमला प्रोत्साहन देण्यासाठी तोशिबा, डेन्सो व सुझुकी या कंपन्यांचं ज्वाइंट व्हेंचर असलेल्या टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लान्टमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडचं स्थानिक स्तरावरील उत्पादन देखील सुरू करण्यात आलं आहे.
८० टक्के इलेक्ट्रिक बॅटरी भारतात स्थानिक स्तरावर निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे भारताचं क्लीन एनर्जी व मॅन्युफॅक्चरिंग लक्ष्य साधण्यास मदत होईल. भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात स्वतःची स्थिती मजबूत करण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्न करत आहे. अशातच गुजरातमध्ये टीडीएस लिथियम आयन बॅटरी प्लान्टची सुरुवात होणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ठेवलेलं लक्ष्य साध्य करण्यास मदत मिळेल.
मारुती वर्षभरात ६७,००० इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार
मारुती सुझुकीने २०२६ मध्ये ६७,००० इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यापैकी मोठा हिस्सा परदेशात निर्यात केला जाईल. ज्यामुळे जागतिक स्तरावरील मेड इन इंडिया उत्पादनांची स्थिती अजून बळकट होईल.