PM Narendra Modi GIfts Online Auction Link : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश व जगभरातून मिळालेल्या १३०० भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव होणार आहे. आजपासून (बुधवार, १७ सप्टेंबर) म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या लिलावाला सुरुवात केली जाणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव चालू असेल. मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम गंगा नदीच्या स्वच्छतेच्या कामासाठी वापरली जाईल. सर्व पैसे नमामि गंगे या मोहीमेसाठी दिले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश व जगभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव केला जातो. यंदा सातवा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लिलावासाठी ठेवलेल्या प्रमुख भेटवस्तूंमध्ये पॅरालिम्पिक २०२४ मधील खेळाडूंनी दिलेल्या वस्तू सर्वात महत्त्वाच्या आहेत. १७०० रुपयांपासून १.०३ कोटी रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या किमतीच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. देश व जगभरातील कुठलीही व्यक्ती या ऑनलाईन लिलावात सहभागी होऊ शकते.

याआधीच्या लिलावातून ५०.३३ कोटी रुपये जमा

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा १७ सप्टेंबरपासून लिलाव सुरू होणार असल्याची माहिती दिली. शेखावत म्हणाले, “गेल्या सहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या सात हजारांहून अधिक भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. याआधीच्या लिलावातून ५०.३३ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम नमामि गंगे मोहिमेसाठी देण्यात आली आहे.

लिलावात कोणकोणत्या वस्तू उपलब्ध असणार?

यावेळी लिलावात अनेक प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतील. यामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती, चित्रे, टोप्या, तलवारी, मंदिरांमधील मूर्ती आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या वस्तू लिलावाच्या माध्यमातून खरेदीसाठी १७ सप्टेंबरपासून उपलब्ध असतील.

तुळजा भवानीची मूर्ती सर्वात महागडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या प्रमुख वस्तूंमध्ये तुळजा भवानीची मूर्ती सर्वात खास आहे. कारण ही या लिलावातील सर्वात महागडी वस्तू आहे. १.०३ कोटी रुपये या मूळ किमतीसह (बेस प्राइस) ही मूर्ती लिलावात उपलब्ध आहे. पॅरालिम्पिक २०२४ मधील रौप्यपदक विजेता निषाद कुमार, कांस्य पदक विजेता अजित सिंह व सिमरन शर्मा यांचे बूट देखील या लिलावात ठेवण्यात आले आहेत.