पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यामध्ये सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळाले. २०१४ प्रमाणे यंदाही मोदींचा करिश्मा पहायला मिळाला. मोदींची लोकप्रियता आजही कायम असल्याचे या निवडणुकीच्या निकालातून पहायला मिळाले. मात्र आता मोदींची ही लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नसून शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तानमध्येही लोक मोदींना आदर्श मानत असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे. ब्रिटनमधील ‘योगोव्ह’ कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पाकिस्तानमधील जनतेच्या दृष्टीने आदर्श व्यक्ती कोण आहे याबद्दल मत जाणून घेत प्रभावशाली व्यक्तीमत्वांची यादी तयार केली. या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

मार्केट रिसर्च आणि डेटा अॅनलिसीस करणाऱ्या ‘योगोव्ह’ कंपनीने जगभरातील जनतेकडून त्यांना आदर्श वाटणारी व्यक्ती कोणती यासंदर्भात मत जाणून घेतले. अमेरिका, युनायटेड किंगड्म, भारताबरोबरच पाकिस्तानमध्येही हे सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणातून जागतिक स्तरावरील एक आणि देशांतर्गत एक अशा याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जागतिक स्तरावरील यादीमध्ये मोदींना मागच्या वर्षीपेक्षा दोन स्थानांनी बढती मिळली आहे. मागच्या वर्षी या यादीत आठव्या क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. भारतामधील यादीत मोदी पहिल्या स्थानी असून दुसऱ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रचार करुन निवडूण आलेल्या मोदींची लोकप्रियता पाकिस्तानमध्येही असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. पाकिस्तानी जनतेच्या दृष्टीने आदर्श व्यक्तींच्या यादीमध्ये मोदी २६ व्या स्थानी आहेत. याच यादीमध्ये दहाव्या स्थानी अभिनेता शाहरुख खान, बाराव्या स्थानी सलमान खान तर अमिताभ बच्चन १७ व्या स्थानी आहेत. पाकिस्तानमधील यादीनुसार पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान अव्वल स्थानी आहेत. चीनमधील यादीमध्येही मोदी २० व्या स्थानी आहेत.

पाकिस्तानबरोबरच युनायटेड किंग्डममधील जनतेने दिलेल्या मतांच्या आधारे आदर्श व्यक्तींच्या यादीत मोदी २० व्या स्थानी असून जर्मनीत २१ व्या स्थानी आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोदी १७ व्या तर ऑस्ट्रेलियात १९ व्या स्थानी, ब्राझील, स्वित्झर्लंण्ड तसेच रशियामध्ये २२ व्या स्थानी, कॅनडाबरोबरच फ्रान्समध्ये २५ व्या स्थानी, सौदी अरेबिया आणि सिंगापूरमध्ये २४ व्या स्थानी आहेत.

जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ‘योगोव्ह’ने यंदा ४१ देशांमधील नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणामध्ये ४२ हजारहून अधिक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जगातील सर्वात प्रभावशाली २० पुरुष आणि २० महिलांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये पुरुषांच्या यादीतील पहिली पाच नावे मागील वर्षाप्रमाणेच आहेत. पहिल्या क्रमांकावर बील गेट्स, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबमा, तिसऱ्या स्थानावर अभिनेता जॅकी चॅन, चौथ्या स्थानावर चीने अध्यक्ष शी जिंगपिंग आणि पाचव्या स्थानावर ‘अलीबाबा’चा संस्थापक जॅक मा यांचा समावेश आहे. या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांचा एकूण स्कोअर ४.८ इतका आहे. पाचव्या स्थानी असणाऱ्या जॅक मा यांचा स्कोअर ४.९ इतका आहे. नरेंद्र मोदींबरोबरच या यादीमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन (१२ व्या स्थानी), शाहरुख खान (१६ व्या स्थानी) आणि सलमान खान (१८ व्या स्थानी) या तीन भारतीयांचा समावेश आहे. एकाही भारतीय क्रिकेटपटूचा या यादीत समावेश नाही. अमिताभ यांचे स्थान मागील वर्षापेक्षा तीन जागांनी खाली घसरले असून शाहरुख आणि सलमान यांचा पहिल्यांदाच या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.