राग, नाराजी माणसाच्या स्वभावाचे पैलू आहेत. मी बरीच वर्ष मुख्यमंत्रीपदी होतो आणि आता पंतप्रधानपदी आहे, पण मला कधीही राग व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही. मी कधी कोणालाही कमी लेखत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अभिनेता अक्षय कुमारला मुलाखत दिली. या मुलाखतीत अक्षय कुमारने मोदींना “तुम्हाला राग येतो का” असा प्रश्न विचारला. यावर मोदी म्हणाले, मी बरीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मला राग व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही, मी कडक शिस्तीचा माणूस आहे, पण मी कधी कोणाचा अपमान केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मी कधी कोणालाही कमी लेखत नाही. मी नेहमी प्रयत्न करतो की एखाद्याच्या कामात मी देखील सहभागी व्हावे, यामुळे मी शिकतो, वेळप्रसंगी त्यांनाही शिकवू शकतो आणि अशा पद्धतीने मी स्वत:ची टीम तयार करतो. शिपायापासून ते प्रधान सचिवांपर्यंत.. मी कधीच कोणाचाही अपमान केला नाही, असे मोदींनी सांगितले.

मी समोरच्याला प्रोत्साहन देतो. एखादा अधिकारी माझ्याकडे मसुदा घेऊन आला की मी त्यात सुधारणा सुचवतो. त्याच्याशी संवाद साधतो. यातून काय होते की समोरचा व्यक्ती पुढच्या वेळी मला काय अपेक्षित आहे, याचा विचार करुनच कागदपत्रे तयार करतो, असे मोदींनी नमूद केले. यामुळे कामाचे विभाजन होत जाते. तुम्ही एखाद्या बैठकीत रागावलात तर बैठकीतील बाकीचे मुद्दे बाजूला राहतात आणि सर्वांच्या मनात तुम्ही बैठकीत चिडलात हेच राहते, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.

मी आधी राग आल्यावर एकांतात कागद घेऊन बसायचो. मी त्यावर संपूर्ण घटनाक्रम लिहून बघायचो. जोवर मनाला शांती मिळत नाही तोवर पुन्हा पुन्हा घटनाक्रम लिहून काढायचो, असेही त्यांनी सांगितले.