पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं आहे. परीक्षा देण्याचा क्षण हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच कुठल्याही प्रकारचं आव्हान स्वीकारण्यासाठी तयार व्हा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदी सरांना आज विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या.

परीक्षेबाबत विचार करु नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हळूहळू अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. तुम्ही त्याचा ताण घेऊन नको. अनेकदा मुलं परीक्षेचा ताण घेतात. त्याचं महत्त्वाचं कारण असतं की पालक दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना करतात. त्याला इतके चांगले मार्क मिळाले, तुला नाही असं म्हणतात. हे असं करणं पालकांनी टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे मुलांवरचा अभ्यासाचा ताण वाढतो. मुलांनी ज्या अडचणी येतात त्या आई-वडील आणि शिक्षकांशी बोललं पाहिजे. परीक्षेचा फार विचार न करता योग्य पद्धतीने तयारी केली पाहिजे.”

अनेकदा कुटुंबातले लोकही तणावासाठी जबाबदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आई वडील बऱ्याचदा मुलांवर दडपण निर्माण करतात. दुसऱ्या घरातल्या मुलांची तुलना आणि आपल्या मुलाशी करतात. तसंच अनेकदा शिक्षकही ताण देतात. मी पालकांना आणि शिक्षकांना हे सांगू इच्छितो की तुम्ही तुलना करु नका. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष भावना किंवा तिरस्कार निर्माण होऊ शकतो.

कुणाचाही द्वेष किंवा तिरस्कार करु नका

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्हाला जर कुणाशी तुलना करायची आहे तर ती तुलना इतर कुणाशी न करता स्वतःशी करा. एखाद्याला १०० पैकी ९० गुण मिळत असतील तर हे लक्षात घ्या की आपण मेहनत जास्त केली पाहिजे किंवा आपण गुण वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. स्पर्धा स्वतःशी करा.”

मित्रांशी सुसंवाद साधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हुशार मुलांचा द्वेष करु नका, तिरस्कार करु नका, त्यांच्याशी स्पर्धा करु नका. उलट त्यांच्याशी मैत्री करा. त्यांच्याकडून ते अभ्यास कसा करतात ते जाणून घ्या. जो गणितात हुशार आहे त्याच्याकडून गणित शिका, ज्याची भाषा चांगली आहे त्याच्याकडून भाषा शिका. अभ्यास आणि शाळा, महाविद्यालयं हे सगळं काही काळासाठी असतं मात्र मैत्री ही कायमची होत असते हे लक्षात असू द्या.” असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

लिहिणं खूप आवश्यक आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “सध्या संगणक आणि मोबाईलचा काळ आहे. या काळात आपण लिहिणं विसरत चाललो आहोत. फक्त परीक्षेचीच उत्तरं नाही तर त्याआधीही लिखाणाची सवय ठेवा. लिहून पाहिल्याने आपल्याला समजतं की आपल्याला किती गोष्टी खरोखर आत्मसात करता आल्या आहेत. तसंच तुम्ही जे लिखाण करता ते तुमच्या लक्षात राहतं” असंही मोदींनी म्हटलं आहे.