राजकीय नेतेमंडळी म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे अमाप संपत्ती असं गणित साधारणपणे मांडलं जातं. याच गणितानुसार देशातील अनेक राजकीय नेतेमंडळींकडे अचानक वाढलेल्या संपत्तीच्या आकड्यांचं विश्लेषण देखील अनेकदा केलं जातं. त्यामुळे एखादी व्यक्ती राजकारणात आली, मंत्रिपदावर आली की तिच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार हे गृहीतच धरलं जातं. एखादी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असेल, तर त्याविषयी अनेक चर्चा आणि अनेक आडाखे देखील बांधले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या जवळपास साडेसात वर्षांपासून देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीविषयी अनेकांना उत्सुकता असणारच. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीचा आकडा जाहीर झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानावे ३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार ३ कोटी ७ लाखांची संपत्ती आहे. पंतप्रधानांच्या नावे शेअर मार्केटमध्ये कोणतेही शेअर्स नाहीत. पण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (८.९ लाख), विमा पॉलिसी (१.५ लाख) आणि २०१२मध्ये २० हजार रुपयांना खरेदी केलेले एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड त्यांच्या नावे आहेत. यासोबतच गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये त्यांच्या नावे १ कोटी ८६ लाख रुपयांची एफडी आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च रोजी ही एफडी १ कोटी ६ लाख रुपये इतकी होती.

पंतप्रधानांच्या नावे कोणतीही गाडी नाही. त्यांच्याकडे ४ सोन्याच्या अंगठ्या आहेत. ज्यांची तेव्हाच्या बाजारभावानुसार किंमत १ लाख ४८ हजार इतकी आहे. ३१ मार्च २०२१ रोजीच्या आकड्यांनुसार त्यांच्या बँकेत १ लाख ५० हजार सेव्हिंग आणि ३६ हजाराची रोख रक्कम त्यांच्याकडे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी आल्यापासून एकही नवी मालमत्ता खरेदी केलेली नाही. त्यांनी २००२मध्ये एक घर खरेदी केलं होतं. या घराची किंमत १ कोटी १० लाखांच्या आसपास आहे. पण त्यात देखील पंतप्रधानांची संयुक्त मालकी असून २५ टक्के भाग त्यांच्या मालकीचा आहे. या मालमत्तेचं एकूण क्षेत्रफळ १४ हजार १२५ चौरस फूट असून त्यातल्या ३ हजार ५३१ चौरस फुटांवर पंतप्रधानांची मालकी आहे.

गेल्या वर्षी ३१ मार्चच्या आकडेवारीनुसार पंतप्रधानांची वैयक्तिक संपत्ती ही २ कोटी ८५ लाख इतकी होती. या वर्षी तिच्यामध्ये २२ लाखांची भर पडली असून ती ३ कोटी ७ लाखांच्या घरात आहे.

अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना केंद्र सरकारने केंद्रातील सर्व मंत्र्यांनी आपली वैयक्तिक संपत्ती दरवर्षी जाहीर करावी असा निर्णय घेतला होता. कामकाजामध्ये पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेतला गेला होता. त्यानुसार दरवर्षी ३१ मार्च रोजी मंत्र्यांची संपत्ती जाहीर करणारं प्रतिज्ञापत्र सर्व केंद्रीय मंत्री सादर करत असतात. यामध्ये पंतप्रधानांच्या प्रतिज्ञापत्राचा देखील समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi personal asset increased by 22 lakhs compared to last year pmw
First published on: 25-09-2021 at 16:58 IST