PM Modi Speaks with Nepal PM Sushila Karki: गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नेपाळमधील जेन झी तरुणाई तत्कालीन ओली सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात रस्त्यावर उतरली आणि आंदोलनाचा भडका उडाला. समाज माध्यमांवर घातलेली बंदी या आंदोलनासाठी तत्कालीक कारण ठरली. आंदोलकांनी पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या निवासस्थानांचं नुकसान केलं. तसेच, अनेक ठिकाणी हिंसक घटनादेखील घडल्या. आता नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले असून नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान झाल्या आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला.
पंतप्रधान मोदी व सुशीला कार्की यांच्यात काय संवाद झाला?
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी झालेल्या संवादासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात कार्की यांच्याशी झालेल्या संवादासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. “नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान श्रीमती सुशीला कार्की यांच्याशी फोनवर उत्तम संवाद झाला. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांचे झालेले मृत्यू वेदनादायी असून त्याबद्दल मी कार्की यांच्याकडे सहवेदना व्यक्त केल्या. शिवाय, नेपाळमध्ये पुन्हा एकदा शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारत ठामपणे नेपाळच्या पाठिशी असल्याबाबतही त्यांना आश्वस्त केले. याशिवाय नेपाळचे नागरिक व त्यांच्या पंतप्रधान कार्की यांना उद्याच्या नेपाळ दिनाच्या शुभेच्छा”, असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सहा महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश
दरम्यान, नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर आता पुढील प्रक्रियेला वेग आला आहे. कार्की यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला येत्या सहा महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेपाळमधील लोकशाही प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा राजकीय पक्षांचा सहभाग अधोरेखित होणार असल्यामुळे भारताच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
Nepal News: पार्लमेंट निवडणूक मार्चमध्ये; नेपाळ अध्यक्षांच्या कार्यालयाची घोषणा
नेपाळमधील अंतरिम सरकारचं भारतातर्फे स्वागत
१३ सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं. भारतानं या राजकीय बदलाबाबत समाधान व्यक्त करतानाच कार्की यांचंदेखील अभिनंदन केलं. “आम्हाला आशा आहे की यामुळे नेपाळमध्ये शांतता व स्थैर्य प्रस्थापित होईल. नेपाळचा जवळचा शेजारी, लोकशाही मित्र आणि दीर्घकालीन विकासाभिमुख सहकारी म्हणून भारत यापुढेही दोन्ही देशांच्या एकत्रित विकासासाठी आणि लोकहितासाठी नेपाळसोबत संयुक्तपणे प्रयत्न करेल”, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं.